रेल्वेत मिळणार स्थानिक जेवण, डायबेटिस फूड; मेन्यू ठरवण्याची मुभा | पुढारी

रेल्वेत मिळणार स्थानिक जेवण, डायबेटिस फूड; मेन्यू ठरवण्याची मुभा

नवी दिल्ली;  वृत्तसंस्था :  लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करताना आपल्या ताटात काय वाढलेले असेल, असा प्रश्न यापुढे पडणार नाही. आता रेल्वेत डायबेटिस फूड, बेबी फूड, डाएट फूडसह त्या त्या राज्यांचे पदार्थ चाखायला मिळणार आहेत. लवकरच देशभरातील लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांत ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

रेल्वेने लांबचा प्रवास करताना नेहमी खाण्याची आबाळ होते. त्यातही पथ्यपाणी असलेल्यांना, तान्ह्या बालकांना खाण्यासाठी घरूनच पदार्थ सोबत घेऊन निघावे लागते. शिवाय, इतरांनाही आपल्या आवडीचे पदार्थ रेल्वेत मिळतीलच याची हमी नसते. त्यामुळे प्रवाशांची अडचण होते. सरसकट उत्तर भारतीय पदार्थ किंवा दक्षिण भारतीय पदार्थ दिले जात असल्याने प्रवाशांकडून नाराजीचा सूर कायम निघतो. यावर आता रेल्वेने तोडगा काढत लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये देण्यात येणार्‍या खानपान सेवेत आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

मेन्यू ठरवण्याची मुभा

भारतीय रेल्वेने आता रेल्वेतील खानपान सेवा हाताळणार्‍या ‘आयआरसीटीसी’ला या गाड्यांतील मेन्यू ठरवण्याची मुभा दिली आहे. तिकिटातच भोजन शुल्क समाविष्ट असेल, तर त्याचा मेन्यू ‘आयआरसीटीसी’ ठरवेल; पण त्याशिवायही स्वतंत्र खाद्यपदार्थ प्रवाशांना घेता येतील. त्याचे दर मात्र ‘आयआरसीटीसी’ निश्चित करेल.

स्थानिक पदार्थही मिळणार

मधुमेही रुग्णांसाठी डायबेटिस फूड, लहान मुलांसाठी बेबी फूड तसेच डाएटवर असणार्‍यांसाठी डाएट फूड उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय ज्या ज्या राज्यांतून ही रेल्वे जाईल त्या त्या राज्यांचे स्थानिक पदार्थही उपलब्ध ठेवले जातील. म्हणजेच महाराष्ट्रातून रेल्वे जात असेल तर वडापाव, मिसळपाव मिळेल; तर गुजरातेतून रेल्वे जात असेल तर ढोकळा, फाफडा मिळेल. प्रवाशांची खाण्याची आबाळ दूर होण्याची आशा रेल्वेने व्यक्त केली आहे.

उत्पन्न वाढणार

रेल्वेतील खानपान सेवेत अनेक पर्याय ठेवल्याने रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होईल, असा रेल्वेला विश्वास आहे. हे करतानाच पदार्थांचे दर ‘आयआरसीटीसी’ निर्धारित करून नियंत्रण ठेवेल तसेच खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही, असेही रेल्वेने म्हटले आहे.

Back to top button