नापाक दहशतवादी कट उधळला!

नवी दिल्ली/मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमच्या इशार्‍यावर महाराष्ट्रासह तीन राज्यांत वेगवेगळ्या ठिकाणी घातपात घडवण्याचा पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवादी कट मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने उधळून लावला. मुंबईत धारावीत राहणार्‍या जान मोहम्मद शेख याच्यासह राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून सहा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

ऐन दिवाळी दसर्‍यात कुठे आणि कसे घातपात घडवायचे याचे प्रशिक्षण या टोळीला डॉन दाऊदचा सख्खा भाऊ अनिस इब्राहिम देत होता. पाकची पातळयंत्री गुप्तचर यंत्रणा आयएसआयने अनिसला हे घातपाताचे कंत्राट दिले होते.

या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रांस्त्रांसह स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दिल्ली पोलिस दलातील स्पेशल सेलने एकाच वेळी अनेक राज्यांत हे मल्टीस्टेट ऑपरेशन करून पाकचे मनसुबे उधळले. हे दहशतवादी महानगरांतून स्फोट घडविण्याच्या बेतात होते. तत्पूर्वीच दिल्ली स्पेशल सेलच्या गोपनीय नेटवर्कच्या माध्यमातून त्यांचे बिंग फुटले. दहशतवाद्यांच्या ताब्यातून काही गोपनीय दस्तावेजही दिल्ली पोलिसांच्या हाती लागले आहेत. सर्व जणांची एकत्रित व स्वतंत्रपणे कसून चौकशी करण्यात येत आहे.

ओसामा, झिशान कमर, मोहम्मद अबू बकर, जान मोहम्मद शेख, मोहम्मद आमिर जावेद आणि मूलचंद लाला अशी या अटक करण्यात आलेल्या पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांची नावे आहेत.

दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात नवरात्री, रामलीला दरम्यान गर्दीच्या ठिकाणी या दहशतवादी संघटनेचा स्फोट घडवण्याचा कट होता. पाकची पाताळयंत्री गुप्तहेर संघटना आयएसआयने या घातपाताची जबाबदारी अनिस इब्राहीमवर सोपवली होती. या सर्वांना अनिस थेट प्रशिक्षण देत होता. या अतिरेक्यांपैकी ओसामा आणि झिशान या दोघांनी याच वर्षी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले आणि भारतात परतल्यापासून त्यांना सतत आयएसआयकडून सूचना येत होत्या. अत्यंत शक्तिशाली आयईडी स्फोटके पेरण्यासाठी ठिकाणे निवडण्यास त्यांना सांगण्यात आले होते.

दिल्ली पोलिस दलाचे विशेष आयुक्त नीरज ठाकूर यांनी सांगितले की, ओसामा आणि झिशान एप्रिलमध्ये मस्कतला गेले होते. तेथून ते
समुद्रमार्गे पाकिस्तानात गेले. तेथे एका फार्म हाऊसमध्ये त्यांना स्फोटके तयार करणे आणि एके-47 चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. मस्कतमधून बंगाली भाषा बोलणार्‍या 15 जणांना पाकिस्तानला नेण्यात आले. त्यांचे दोन समूह केले होते. एका समूहाचा समन्वयक दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम होता. सीमेपलीकडून आलेली शस्त्रास्त्रे व स्फोटके विविध राज्यांत पोहचवणे, ही या समूहाची जबाबदारी होती. दुसर्‍या समूहाला हवालाच्या माध्यमातून पैसा उभारण्याचे काम दिले होते.

अनिसने जान मोहम्मद शेख व मूलचंद यांच्यावर दिल्लीतून स्फोटके आणि शस्त्रांचा साठा ताब्यात घेण्याची जबाबदारी सोपवली होती. या कामगिरीवर असतानाच जान मोहम्मदला राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आली. मुंबईच्या धारावीत राहणार्‍या जान मोहम्मदला एटीएसने अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आणि एटीएस पथकाने धारावीत जाऊन जान मोहम्मदची पत्नी आणि परिचितांची चौकशी सुरू केली आहे.

ओसामाला करायचे होते नावाचे सार्थक

दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव मोहम्मद ओसामा असून, तो दिल्ली येथील रहिवासी आहे. त्याचे नामकरणही कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याच्या नावावरून करण्यात आले होते, असे सांगण्यात येते. मुस्लिमेतरांना धडा शिकवून आपले नाव सार्थक करणे, हे त्याचे ध्येय होते, असेही पोलिस दलातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

धारावीतील कालिया

दाऊदच्या इशार्‍यावर महाराष्ट्रासह देशभरात घातपात घडवण्यास निघालेल्या सहा पैकी एक जान मोहम्मद शेख ऊर्फ समीर कालिया हा 47 वर्षीय अतिरेकी अंडरवर्ल्डचा हस्तक म्हणून ओळखला जातो. धारावीतील केलाबखरमध्ये तो लहानाचा मोठा झाला. काही वर्षांपूर्वी त्याच्या आई वडिलांचे निधन झाले. पत्नी आणि एक 22 वर्ष आणि एक 11 वर्षाच्या मुलीसह तो इथे राहतो.तो चालक म्हणून काम करत असे. स्वत: कमी शिकलेला पण त्याच्या दोन्ही मुली शिक्षण घेत होत्या.पत्नी हाताला मिळेल ते काम करते. काही रहिवाश्यांनी त्याला सोमवारी दुपारी देखील घराच्या परिसरात पाहिले होते.

मंगळवारी त्याला अटक होताच सर्वांनाच धक्का बसला. कालीयाला अटक झाल्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्ष चार आणि पाच आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस त्याच्या घरी मंगळवारी संध्याकाळी पोहचले.

सुमारे दोन ते तीन तास पोलिसांनी या कुटुंबाची चौकशी केली. नंतर त्यांना धारावी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.पोलिसांनी आजू बाजूचा विभाग तपासला, घराची झडती घेतली शेजार्‍यांकडे देखील विचारपूस केली आहे. मुंबईत त्याचे आणखी कोण साथीदार आहेत याचा शोध घेतला जात आहे.

धारावीतील समीर कालिया हा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिमच्या अत्यंत जवळच्या हस्तकासाठी काम करतो. त्याचे कार्यक्षेत्र मुंबईच राहिले. मात्र, ऐन सणासुदीत घातपात करण्यासाठी या हस्तकाने समीरची निवड केली आणि पाकिस्तानात बोलावत त्याला प्रशिक्षणही दिले. ज्या ठिकाणी स्फोट घडवायचे होते त्या सर्व ठिकाणी अत्यंत स्फोटक आयईडी पोहोचवणे, अतिरेक्यांसाठी शस्त्रास्त्रे तसेच हातबॉम्ब पोहोचवण्याची जबाबदारी समीर कालियावर टाकण्यात आली होती. राजस्थानातील कोटा येथून दिल्लीकडे जात असतानाच त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली.

Back to top button