मोदी-जिनपिंग भेट फक्त शेकहँडपुरती | पुढारी

मोदी-जिनपिंग भेट फक्त शेकहँडपुरती

बाली; वृत्तसंस्था : जी-20 शिखर परिषदेचा पहिला दिवस संपल्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग समोरासमोर आले; पण एकमेकांना औपचारिक अभिवादन आणि हस्तांदोलन करून ही भेट संपली. दरम्यान, बालीमध्ये या दोन नेत्यांची औपचारिक बैठक होणार नसल्याचे वृत्त आहे.

2020 पासून मोदी आणि जिनपिंग यांच्यात औपचारिक बैठक झालेली नाही. गलवान खोर्‍यात झालेला रक्तरंजित संघर्ष आणि त्यानंतर वाढलेला तणाव, या पार्श्वभूमीवर भारत आणि चीन यांचे संबंध ताणले गेले आहेत. सप्टेंबरमध्ये समरकंद येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत सहभागी होऊनही दोन नेत्यांत चर्चा झाली नव्हती. त्यामुळे आता बालीमध्ये दोन नेते आमने-सामने चर्चेला बसतील का? याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती.

मंगळवारी बालीत जी- 20 शिखर परिषद सुरू झाली; पण तेथेही मोदी आणि जिनपिंग यांच्यात अनौपचारिक भेट झाली नाही. पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यावर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी आयोजित केलेल्या मेजवानीला सर्व राष्ट्रप्रमुख उपस्थित होते. या मेजवानीत पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग समोरासमोर आले. सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या; पण एकमेकांना औपचारिक अभिवादन आणि हस्तांदोलन करून दोन नेते वेगळे झाले. त्यांच्यात कोणतेही बोलणे झाले नाही. दरम्यान, या दोन नेत्यांत औपचारिक बैठक होणार आहे की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, बुधवारी मोदी इतर काही राष्ट्रप्रमुखांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत.

Back to top button