‘चीन सीमेवरील स्थिती स्थिर; पण बेभरवशाची’ | पुढारी

'चीन सीमेवरील स्थिती स्थिर; पण बेभरवशाची'

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीनने लडाखमध्ये फारशी सैन्य कपात केलेली नाही. तेथील परिस्थिती स्थिर; पण बेभरवशाची असल्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी म्हटले आहे. भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रविवारी हे महत्त्वपूर्ण विधान केले.

‘चाणक्य डॉयलॉग्ज’ या एका अभ्यासगटासमोर भारत-चीन तणाव, सीमेवरील परिस्थिती आणि दोन देशांच्या लष्करामधील चर्चा, याबाबत जनरल पांडे म्हणाले की, लडाखमध्ये चीनने फार मोठी सैन्य कपात केलेली नाही. पूर्व लडाखमध्ये सीमाभागात रस्ते, पूल यासह पायाभूत सुविधा उभारणीचे काम अविरत सुरूच आहे. त्यात घट झालेली नाही. भारतीय लष्कर सज्ज आहेच; पण या भागात अधिक सतर्कता बाळगून आहे.

हिवाळ्याच्या द़ृष्टीने मोर्चेबांधणी

आता आपण तेथे हिवाळ्याच्या द़ृष्टीने मोर्चेबांधणी करीत आहोत. पूर्व लडाखमधील स्थितीचे थोडक्यात वर्णन करायचे झाल्यास परिस्थिती स्थिर; पण बेभरवशाची आहे, असे म्हणावे लागेल. प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारताला आपले हितरक्षण करण्यासाठी अतिशय सावधगिरीने रणनीती अंमलात आणावी लागत आहे.

दोन देशांच्या सैन्य पातळीवर होत असलेल्या चर्चेबाबत जनरल पांडे यांनी सांगितले की, काही प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी भारत पुढील फेरीकडे लक्ष ठेवून आहे. 17 व्या फेरीच्या चर्चेच्या तारखेकडे लक्ष ठेवून आहोत.

Back to top button