तीन वर्षांपासून बंद असलेल्या काँग्रेस अध्यक्षांच्या कार्यालयाची हो‍णार साफसफाई | पुढारी

तीन वर्षांपासून बंद असलेल्या काँग्रेस अध्यक्षांच्या कार्यालयाची हो‍णार साफसफाई

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मल्लिकार्जुन खरगे यांची नुकतीच काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे मागील तीन वर्षापासून बंद असलेल्या काँगेस कार्यालयाचे दार उघडण्यात आले आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी २४ अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयाला भेट दिली. यावेळी कार्यालयात कोळ्याचे जाळे आणि सगळीकडे धूळ होती. आता या कार्यालयाची साफसफाई करण्यात येणार आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर औपचारिकपणे २०१९ पासून कार्यालय बंद करण्यात आले होते. आता मल्लिकार्जुन खर्गे दररोज काँग्रेस कार्यालयात बसण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे सरचिटणीसही त्यांचे अनुकरण करून २४ अकबर रोडला पूर्वीपेक्षा जास्त वेळा भेट देतील. दरम्यान, कार्यालयातील फर्निचर साफसफाईसाठी पाठवण्यात आल्याचे त्यांच्या भेटीदरम्यान आढळून आले.

काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांना रिपोर्ट करायला दिल्लीत कोणीच नसल्याचे दिसून आले. राहुल गांधी सध्या त्यांच्या भारत जोडो यात्रेवर आहेत आणि सोनिया गांधी त्यांच्या सुट्ट्या दिल्लीबाहेर घालवत आहेत.

पूर्वीच्या काँग्रेस अध्यक्षांकडे आर.के धवन, व्ही जॉर्ज आणि अहमद पटेल यासारखे दिग्गज सहकारी होते. दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे हे त्यांचे सहकारी सय्यद नसीर हुसेन यांना पक्षात आपले डोळे आणि कान बनविण्याच्या तयारीत आहेत. सय्यद नसीर हुसेन यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना कर्नाटकमधून राज्यसभेवर निवडून येण्यास मोठी मदत केल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button