लक्ष्मीपूजनानंतर दुसर्‍या दिवशी सूर्यग्रहण ... 27 वर्षांनंतर दिवाळीत योग | पुढारी

लक्ष्मीपूजनानंतर दुसर्‍या दिवशी सूर्यग्रहण ... 27 वर्षांनंतर दिवाळीत योग

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  यंदाचे दुसरे आणि अखेरचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबरला आहे. तब्बल 27 वर्षांनंतर दिवाळी सणाच्या दिवसांत ग्रहणाचा योग आलेला आहे. लक्ष्मीपूजनानंतर (24) दुसर्‍या दिवशी खग्रास सूर्यग्रहण अनुभवण्याची खगोलप्रेमींना संधी आहे.

यापूर्वी एप्रिल महिन्यात सूर्यग्रहण झाले होते. भारतात हे सूर्यग्रहण दिसणार असले तरी सध्या आपल्याकडे असलेल्या ढगाळ वातावरणामुळे खगोलप्रेमींचा विरस होण्याची शक्यता आहे. आकाश मोकळे राहिले तरच ग्रहण बघता येईल. सणावर ग्रहणाचा काहीही प्रभाव नसल्याचे धर्मशास्त्रातील जाणकारांचे मत आहे. सामान्यपणे दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी केली जाणारी गोवर्धन पूजा यावेळी ग्रहणामुळे 25 ऐवजी 26 ऑक्टोबरला केली जाईल, असे एका जाणकाराने सांगितले. मिथुन, तूळ आणि मकर राशीच्या लोकांवर या सूर्यग्रहणाचा विशेष प्रभाव राहील, असे ज्योतिषशास्त्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

सुतककाळ 12 तास आधी

भारतात सूर्यग्रहण दुपारी चारच्या सुमारास दिसणार असल्याने धर्मशास्त्रानुसार त्याच्या 12 तास आधी पहाटे चारपासून सुतककाळ सुरू होईल. छाया पहाटे 4 वाजून 49 मिनिटे, स्पर्श दुपारी 4 वाजून 49 मिनिटांनी असेल, तर मोक्ष सायंकाळी सहा वाजून 8 मिनिटे असे असणार आहे.

 

Back to top button