नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती तसेच राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या कृती आराखड्याचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी आढावा घेतला. प्रदूषण रोखण्यासाठी आतापर्यंत चालवण्यात आलेल्या सर्व अभियानाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा घेण्यात आला. तज्ञांच्या अहवालानूसार दिवाळी नंतर प्रदूषणाची पातळी वाढू शकते. अशात ग्रेडेड रिस्पान्स ऍक्शन प्लॅन (जीआरएपी) नूसार दिल्लीत ज्या बंदी घालण्यात आलेल्या आहेत त्या लागू केल्या जातील,अशी माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिली.
२८ नोव्हेंबरपासून 'रेड लाईट ऑन गाडी ऑफ' अभियान सुर केले जाईल. एक महिन्यापर्यंत हे अभियान रावले जाईल. यात सिव्हिल डिफेंस चे अडीच हजार स्वयंसेवक कार्यरत राहतील. शंभर मोठ्या चौकांना यासाठी चिन्हित करण्यात आले आहे. दोन शिफ्टमध्ये स्वयंसेवक हे काम करतील. दिवाळीत फटाके फोडण्यासंबंधी सुरू असलेल्या राजकारणावर राय म्हणाले, आमच्यावर सर्वांची जबाबदारी आहे.आम्ही सर्वांच्या सहकार्यानेच प्रदूषणावर आळा घालू शकतो. यात राजकारण करू नये. राज्यात प्रदूषणाची पातळी वाढली तर 'ऑड-इव्हन' लागू केले जाईल, असे संकेत देखील राय यांनी दिले.