गुप्तधनाच्या आमिषाने फसवणूक; मांत्रिकासह 11 जणांवर गुन्हा | पुढारी

गुप्तधनाच्या आमिषाने फसवणूक; मांत्रिकासह 11 जणांवर गुन्हा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : घरातील गुप्तधन मिळवून देण्याच्या आमिषाने शुक्रवार पेठ येथील आरती सामंत या महिलेची चार लाख 40 हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील मांत्रिकासह 11 जणांवर मंगळवारी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा जादूटोणा कायद्यान्वये संशयितांवर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मांत्रिकांसह साथीदारांनी आरती सामंतला गुप्तधनाचे आमिष दाखविले. त्यासाठी शुक्रवार पेठ येथील घरात 15 फूट खोल खड्डा काढून त्यात बकर्‍यांचा बळी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आल्याने अधिकारीही चक्रावले आहेत.

संशयित मांत्रिक किशोर भगवान लोहार (शिरोली पुलाची), नामदेव शामराव पोवार (जोगेवाडी, राधानगरी), बाळू रामचंद्र सुतार (लक्षतीर्थ वसाहत), अक्षय अनिल हेगडे (कंदलगाव, करवीर), गजानन भगवान लोहार (शिरोली पुलाची), अनिल लक्ष्मण सुतार (शिरोली पुलाची), शशिकांत कांबळे (उजळाईवाडी परिसर), राजन (शिरोली पुलाची), वैभव चौगुले (कसबा बावडा), फडणीस महाराज अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.

शुक्रवार पेठ येथील पंचगंगा हॉस्पिटल परिसरात राहणार्‍या आरती अनंत सामंत (वय 45) यांचा पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील रस्त्यालगत शेतवडीत डोक्यात वर्मी हल्ला करून खून करण्यात आला होता. दि. 30 सप्टेंबरला सायंकाळी ही घटना घडली होती. करवीर पोलिसांनी जोगेवाडी (ता. राधानगरी) येथील मांत्रिक नामदेव शामराव पोवारला अटक केली होती.

भोंदू साखळीचा छडा लावून कारवाईची मागणी

करवीर पोलिसांच्या चौकशीत गुप्तधनाच्या लालसेतून आरतीचा खून झाल्याचा प्रकार उघडकीला आला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी खुनाच्या घटनेच्या मुळाशी जाऊन कटात सहभागी असलेल्या सर्वांविरुद्ध जादूटोणा कायद्यांतर्गत कारवाईची मागणी केली होती. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही घटनेची दखल घेत लक्ष्मीपुरी व करवीर पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.

सल्ला झुगारल्यास नाग त्रास देऊ शकतो : मात्रिकांकडून भीती

किशोर लोहार, नामदेव पोवार व अन्य संशयितांनी आरतीला घरातील गुप्तधन मिळवून देतो. आमचा सल्ला मानला नाही तर घरासह परिसरात संचार असलेला नाग तुम्हाला त्रास देऊ शकतो, अशी भीती दाखविली. मांत्रिकांनी जादूटोणा करण्यासाठी सामंत यांच्या घरी 15 फुटांचा खोल खड्डा खोदला. विधी पूर्ण करण्यासाठी 4 लाख 40 हजार रुपये उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

खोदलेल्या खड्ड्यात बकर्‍यांचा बळी

नागाची भीती दाखविण्याबरोबरच खोदलेल्या खड्ड्यात बकर्‍यांचा बळीही देण्यास भाग पाडले. पूजा न केल्यास काही दिवसांत मृत्यू संभवतो, असे सांगून संशयितांनी आरतीची सतत आर्थिक पिळवणूक केल्याचे तिचा भाऊ निरंजन दीक्षित यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

संशयितांना लवकरच अटक

गुप्तधनाचे आमिष दाखवून आरतीला साडेचार लाखांना गंडा घालणार्‍या संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस उपनिरीक्षक इकबाल महात यांनी सांगितले.

हे ही वाचा :

Human Sacrifice in Kerala : मुख्य आरोपी मनोलैंगिक विकृतीने पछाडलेला, बळीनंतर मांसही शिजवून खाल्ल्याचा संशय

Human Sacrifice in Kerala – केरळमध्ये नरबळी : धनलाभासाठी २ महिलांचा शिरच्छेद करून शरीराचे केले तुकडे

Back to top button