पराभव झालेल्या 144 जागांवर विजयासाठी भाजपचा मेगा प्लॅन | पुढारी

पराभव झालेल्या 144 जागांवर विजयासाठी भाजपचा मेगा प्लॅन

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्याकरिता जोरदार कंबर कसली आहे. त्यासाठी पक्षाने 2019 मध्ये पराभव झालेल्या 144 जागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या 144 जागांपैकी 40 जागांवर स्वत…
पंतप्रधान नरेंद्र मोदी विशाल सभा घेणार आहेत. उर्वरित जागांवर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासारखे बलाढ्य नेते मैदानात उतरणार आहेत.

भाजप सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गतनिवडणुकीत ज्या 144 जागांवर हार पत्करावी लागली, तेथे विजयासाठी अधिकाधिक प्रयत्न केले जाणार आहेत. भाजपने लोकसभेच्या या जागांची 40 विभागांत वाटणी केली आहे. पंतप्रधानांच्या 40 सभा सर्वच या सगळ्या विभागांत होणार आहेत. उर्वरित 104 जागांवर जे. पी. नड्डा, अमित शहा व अन्य केंद्रीय मंत्री सभा घेऊन प्रचार करणार आहेत. भाजपच्या व्यूहरचनेनुसार बड्या नेत्यांचे दौर होतील तेव्हा स्थानिक नेत्यांनी या नेत्यांसोबत सातत्याने बैठका घेणे आवश्यक आहे. तसेच भाजपच्या स्थानिक नाराज नेत्यांच्या तक्रारींवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जाहीर सभांच्या तयारीची अंमलबजावणी, लोकांना कार्यक्रमस्थळी आणणे, राजकीय व्यवस्थापन, संबंधित मतदारसंघाची खडान्खडा माहिती संकलित करणे यांसारखी कामे विविध
नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांच्या फळीवर सोपवण्यात आली आहेत.

प्रचारादरम्यान प्रमुख स्थानिक नेते आणि कॅबिनेट मंत्री तेथील धार्मिक नेते, संत व विविध समुदायाच्या नेत्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटणार आहेत. स्थानिक सार्वजनिक उत्सव व परंपरांतही हे बडे नेते सक्रिय सहभागी होणार आहेत. संघाशी संबंधित सर्वच संघटनांच्या स्थानिक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसोबतही हे बडे नेते बैठका घेणार आहेत. याशिवाय स्थानिक प्रभावी मतदार विशेषत…
वकील, डॉक्टर्स, प्राध्यापक, व्यापारी व अन्य व्यावसायिकांसोबतही ते नियमित व्हर्च्युअल बैठका घेणार आहेत.

144 जागांवरील अहवाल सादर

सप्टेंबर महिन्यात भाजप मुख्यालयात आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या विषयावर महत्त्वाची बैठक झाली होती. त्यात पक्षाध्यक्ष
नड्डा व अमित शहा यांनी विविध नेत्यांसोबत 144 जागांसंबंधी विचारमंथन केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्र्यांनी आपल्याकडे
सोपवण्यात आलेल्या 3 ते 4 लोकसभा मतदारसंघांतील स्थितीचा अहवालही त्या बैठकीत सादर केला होता.

Back to top button