‘चीन’च्या औद्योगिक लेझर मशिनची होणार अँटी-डंपिंग तपासणी | पुढारी

‘चीन’च्या औद्योगिक लेझर मशिनची होणार अँटी-डंपिंग तपासणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने चीनवरून आयात करण्यात येणार्‍या औद्योगिक लेझर मशिनच्या ‘डंपिंग’ संबंधी तपास सुरू केला आहे. औद्योगिक लेझर मशिन देशात मोठ्या प्रमाणात उद्योगांमध्ये कटिंग, मार्किंग तसेच वेल्डिंगसाठी वापरात येते. भारतीय कंपनीच्या तक्रारीनंतर सरकारच्या वतीने हा अँटी-डंपिंग तपास सुरू करण्यात आला आहे. खराब गुणवत्तेच्या उत्पादनांच्या आयातीवर आळा घालण्याचा उद्देश या तपासामागे असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्रालय अंतर्गत येणार्‍या व्यापार उपचार महासंचालनालय (डीजीटीआर) चीनमधून येणार्‍या या लेझर मशिनचा तपास करणार आहे. सहजानंद लेझर टेक्नोलॉजीने अँटी डंपिंगचा तपास सुरू करण्याची मागणी करीत अर्ज सादर केला होता. चीनवरून येणार्‍या स्वस्त मशिनमुळे देशांतर्गत व्यापार प्रभावित होत असल्याचा दावा अर्जातून करण्यात आला होता.

बाहेरील उत्पादनांवर अँटी डंपिंग ड्युटी

‘डंपिंग’ ही एक अयोग्य व्यापार पद्धत आहे. एखाद्या सामान्य उत्पादनाला त्याच्या सामान्य मूल्यापेक्षा कमी किमतीला निर्यात करण्यास ही पद्धत भाग पाडते. याला दंडात्मक अँटी-डंपिग ड्युटीद्वारे थोपवले जाते. अप्रत्यक्ष आयात रोखण्यासाठी सेफगार्ड शुल्क आकारले जाते. जेणेकरून घरगुती उद्योग वाचू शकतील. जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) जिनेव्हा कन्वेंशनच्या आधारावर अँटी डंपिंग ड्युटी लावण्यात आली आहे. निष्पक्ष व्यापाराला प्रोत्साहन देणे हे यामागचा उद्देश आहे.

Back to top button