LPG cylinder price | सिलिंडर दरात ३६ रुपयांपर्यंत कपात, जाणून घ्या नवे दर

LPG cylinder price | सिलिंडर दरात ३६ रुपयांपर्यंत कपात, जाणून घ्या नवे दर
Published on
Updated on

नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात (LPG cylinder price) २५.५० रुपयांची कपात केली आहे. यामुळे दिल्लीत १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १,८९५ रुपयांवरुन १,८५९ रुपयांवर आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या माहितीनुसार, दिल्लीत १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडर दरात २५.५० रुपयांनी, कोलकातामध्ये ३६.५० रुपये, मुंबईत ३२,५० रुपये आणि चेन्नईत ३५.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. नवीन दर १ ऑक्टोबरपासून लागू आहेत.

कोलकातामध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १,९९५.५० रुपये ऐवजी १,९५९ रुपये असेल. तर मुंबईत या सिलिंडरची किंमत १,८४४ रुपये ऐवजी १,८११.५० रुपये असेल. चेन्नईमध्ये हा सिलिंडर २,००९ रुपयांना मिळेल. १ सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या. त्यापूर्वी ६ जुलै रोजी १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात प्रति युनिट ८.५ रुपये कपात करण्यात आली होती.

दरम्यान, घरगुती सिलिंडरच्या किमतीत बदल झालेला नसून त्याचे दर स्थिर आहेत. ६ जुलै रोजी १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. यापूर्वी १९ मे रोजी घरगुती सिलिंडरच्या किमतीत बदल झाला होता. राज्यातील सिलिंडरचे दर तेथील व्हॅटवर अवलंबून असतात. (LPG cylinder price)

सीएनजी आणि पीएनजी महागणार….

दरम्यान, नैसर्गिक वायूच्या किमतीत ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. वाढीव दर १ ऑक्टोबरपासून लागू होतील आणि ३१ मार्च २०२३ पर्यंत कायम राहतील. नैसर्गिक वायूच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलिंडर मिळणार नाहीत…

घरगुती एलपीजी ग्राहकांना आता नव्या नियमानुसार एका कनेक्शनवर वर्षभरात फक्त १५ सिलिंडर मिळणार आहेत. तसेच कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलिंडर घेऊ शकणार नाही. तिन्ही तेल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

आतापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शन असलेल्या ग्राहकांना हवे तेवढे सिलिंडर मिळत होते. तथापि, नव्या नियमानुसार, घरगुती एलपीजी ग्राहकांना वर्षभरात १५ सिलिंडरच मिळणार आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडरवर घालण्यात आलेल्या मर्यादेबाबत वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलिंडरसंदर्भातील रेशनिंगसाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच याची तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे.

अनेकदा व्यावसायिक वापरासाठी अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. यासंदर्भातील अनेक तक्रारी वारंवार समोर येत असल्यामुळे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या संख्येवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे. अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरसाठी नोंदणी केलेल्यांना त्या दराने वर्षभरात केवळ 15 सिलिंडर मिळणार आहेत. यापेक्षा जास्त सिलिंडरची गरज भासल्यास ग्राहकांना अनुदान नसलेले सिलिंडर घ्यावे लागेल. एखाद्या ग्राहकाला गॅसची जास्त किंमत मोजावी लागत असेल, तर त्याचा पुरावा देऊन त्याला तेल कंपनीच्या अधिकार्‍यांची परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतरच संबंधित ग्राहकाला अतिरिक्त रीफिल मिळू शकेल, असे सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news