पुढारी ऑनलाईन – केंद्र सरकार नैसर्गिक वायूच्या किंमतीत मोठी वाढ करणार असल्याची शक्यता आहे. १ ऑक्टोबरला नैसर्गिक वायूचे नवे दर ठरवले जाणार आहेत. नैसर्गिक वायूचा वापर ऊर्जा निर्मिती, खत निर्मती आणि CNG साठी होत असल्याने ही दरवाढ झाली तर त्याचे फार मोठे परिणाम होणार आहेत. (Natural Gas price may be hiked)
संभाव्य दरवाढीचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्स आणि द मिन्ट या वेबसाईटनी दिलेले आहे. गेल्या काही महिन्यात ऊर्जेच्या किंमती वाढत असल्याने सरकाराला ही दरवाढ करावी लागणार आहे. ONGC (Oil and Natural Gas Corporation) या सरकारी कंपनीला सध्या दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिटस इतक्या नैसर्गिक वायूसाठी ६.१ डॉलर इतकी रक्कम द्यावी लागते. ही रक्कम ९ डॉलर इतकी वाढण्याची शक्यता आहे. तर केजी बेसिनमध्ये काम करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला सध्या दिल्या जाणाऱ्या ९.९२ डॉलरच्या जागी १२ डॉलर इतकी रक्कम द्यावी लागणार आहे. जेथून नैसर्गिक वायू मिळवाला जातो त्या ठिकाणांचे व्यवस्थापन, नियंत्रण यासाठी ही रक्कम द्यावी लागते.
संभाव्य दरवाढ ही आतापर्यंतची सर्वांत मोठी ठरणार आहे. सरकार दरवर्षी १ एप्रिल आणि १ ऑक्टोबरला नैसर्गिक वायूचे दर जाहीर करत असते. कॅनडा, रशिया, अमेरिका या देशांतील नैसर्गिक वायूचे दर विचारात घेऊन भारतातील दर ठरवले जाते. पण देशांतर्गत उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक वायूचे दर कशा प्रकारे ठरवले जावेत, हे ठरवण्याची केंद्र सरकारने समिती स्थापन केलेली आहे. ही समिती या महिना अखेरीस अहवाल सादर करणार होती, पण याला विलंब होणार आहे.
हेही वाचा