Vatsal Nahata | प्रेरणादायी! ६०० ईमेल्स, ८० कॉल्स : २३ वर्षांच्या तरुणानं मिळवली वर्ल्ड बँकेत नोकरी

Vatsal Nahata | प्रेरणादायी! ६०० ईमेल्स, ८० कॉल्स : २३ वर्षांच्या तरुणानं मिळवली वर्ल्ड बँकेत नोकरी
Published on
Updated on

नवी दिल्ली : असं म्हटलं जातं की मनापासून केलेलं काम आणि मेहनत कधीच वाया जात नाही आणि यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. २३ वर्षाच्या वत्सल नाहाटा (Vatsal Nahata) याने हेच करुन दाखविले आहे. वत्सलला जागतिक बँकेत (World Bank) नोकरी मिळाली आहे. पण त्याचा इथंपर्यंत पोहोचण्याचा प्रवास प्रेरणादायी आहे. जागतिक बँकेत नोकरी मिळवणे हे वत्सलचे स्वप्न होते. ही नोकरी मिळवण्यासाठी त्याने एक नाही दोन नाही तर तब्बल ६०० ईमेल आणि ८० फोन कॉल्स केले. त्यानंतर कुठे त्याला नोकरी मिळाली. त्याने त्यांचा नोकरी मिळवण्यासाठीचा संपूर्ण प्रवास लिंक्डइनवरील एका पोस्टमधून कथन केला आहे. या पोस्टला १५,००० हून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याची ही प्रेरणादायी कहाणी जवळपास १०० लोकांनी शेअर केली आहे.

वत्सलने अमेरिकेतील येल विद्यापीठातून पदवी शिक्षण घेतले आहे. ज्यावेळी २०२० मध्ये कोरोनाने जगाला संकटात टाकले त्या दरम्यानच वत्सल येल विद्यापीठातील पदवी शिक्षण पूर्ण करुन बाहेर पडणार होता. बाहेर कोरोनाची परिस्थिती असल्याने त्यावेळी नोकरी मिळवणे कठीण झाले होते. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. "माझ्याकडे नोकरी नव्हती आणि माझे पदवी शिक्षण २ महिन्यांत पूर्ण होणार होते. मी येल ‍विद्यापीठात विद्यार्थी होतो. तेव्हा माझ्या मनात विचार आला की मी येथे नोकरी मिळवू शकत नाही. तेव्हा येलमध्ये शिक्षणासाठी येण्याचा काय उपयोग आहे. माझ्या आई-वडिलांनी जेव्हा मला फोन करून कसे चालले आहे हे विचारले तेव्हा त्यांना सांगणे मला कठीण झाले," असे वत्सल म्हणतो.

"पण मी ठरवले होते की भारतात परतणे हा पर्याय नाही. माझा पहिला पगार केवळ डॉलर्समध्येच असेल. नोकरीचे अर्ज अथवा जॉब पोर्टल्सवर जाण्याचे टाळले आणि networking चा मार्ग स्वीकारला. हा मी एकप्रकारे धोका पत्करला होता," असे तो पुढे म्हणाला. दोन महिन्यांत लिंक्डइनवर १,५०० हून अधिक कनेक्शन रिक्वेस्ट (connection requests) पाठवल्या. ६०० ईमेल पाठवले. ८० कॉल्स आले तरीही मोठ्या संख्येने नोकरीसाठी नकार मिळाला, असेही तो म्हणाला. २०१० च्या 'द सोशल नेटवर्क' चित्रपटातील 'द जेंटल हम ऑफ एन्झाईटी' हे त्याचे यूट्यूबवर सर्वाधिक प्ले केले जाणारे गाणे ठरल्याचे त्याने सांगितले.

"शेवटी माझी मेहनत सार्थकी लागली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला ४ जॉब ऑफर आल्या. त्यात जागतिक बँकेतील नोकरीचा समावेश होता. नोकरीसाठी जागतिक बँकेची निवड केली. माझ्या व्यवस्थापकाने मला जागतिक बँकेच्या सध्याच्या संशोधन संचालकांसोबत मशीन लर्निंग पेपरवर सह-लेखनाची ऑफर दिली, असे वत्सल सांगतो.

दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC) मधून अर्थशास्त्रातून पदवीधर असलेला वत्सल (Vatsal Nahata) म्हणतो की कठीण परिस्थितीने त्याला काही गोष्टी शिकवल्या. नेटवर्किंग ही माझी ताकद बनली. मी कोणत्याही परिस्थितीत टिकून राहू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला.

आपल्याला आलेला अनुभव जगासोबत शेअर करण्याचा उद्देश हा आहे की लोकांनी कधीही हार मानू नये यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे. "तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकत असाल आणि जर तुम्ही तुमचे प्रयत्न सोडले नाहीत तर चांगले दिवस येतील,", असे त्याने पोस्ट संपवताना नमूद केले आहे.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news