Delhi Heavy Rain : मुसळधार पावसाने दिल्ली तुंबली, एक्सप्रेस वे बुडाला; वाहनांच्या लांबच लांब रांगा | पुढारी

Delhi Heavy Rain : मुसळधार पावसाने दिल्ली तुंबली, एक्सप्रेस वे बुडाला; वाहनांच्या लांबच लांब रांगा

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : दिल्ली एनसीआरमध्ये (Delhi Heavy Rain) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गुरुग्राममधील परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. अनेक भागात पाणी तुंबले असून, त्यामुळे शहरातील बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पाणी साचल्याचा परिणाम दिल्ली – गुरुग्राम द्रुतगती मार्गावरही दिसून येत आहे. गुरुवारी या एक्स्प्रेस वेवर अनेक किलोमीटर लांब लागलेल्या वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या.

तुबलेल्या पाण्यात अडकलेल्या ट्रॅफिक जॅममुळे दिल्लीहून गुरुग्राम आणि गुरुग्राम ते दिल्लीकडे (Delhi Heavy Rain) येणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने अनेक वाहनेही थांबली व बुडाली होती. अशा वाहनांना नंतर वाहतूक पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. पावसामुळे गुरुग्राममधील काही निवासी भागातही पाणी शिरले आहे. दुसरीकडे, शहरातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वसामान्यांना घरातूनच काम करण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच पाऊस पाहता शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.

गुरुग्राममध्ये (Delhi Heavy Rain) पडतअसलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे जिल्हा प्रशासनाने लोकांना घरून काम करण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने सर्वसामान्यांसाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे. पाणी साचण्यासारख्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी व मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

पावसामुळे दिल्ली-गुरुग्राम एक्सप्रेसवे आणि गुरुग्रामच्या लगतच्या भागात पाणी साचण्याची ही पहिली घटना नाही. या वर्षी मे महिन्यात दिल्ली आणि एनसीआरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले होते आणि बराच काळ जाम झाला होता. तेव्हा गुरुग्राममधील बख्तावर चौक, एमडीआय चौक, डीएलएफ फेज 1 मेट्रोजवळील परिसर, कन्हाई चौक, अग्रसैन चौक आणि इतर अनेक भागात पाणी साचले होते. 23 मे रोजी अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता, गुरुग्रामच्या जिल्हा अधिकाऱ्याने लोकांना घरातून काम करण्याचा सल्ला दिला होता.

पावसामुळे फक्त दिल्ली एनसीआर आणि गुरुग्राममध्येच असे घडत आहे असे नाही. तर काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्येही मुसळधार पावसानंतर शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तेथे अनेक भाग पाण्यात बुडाले होते, अनेक ठिकाणांहून लोकांना वाचवण्यात यश आले आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने कार्यालये, शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.


अधिक वाचा :

Back to top button