
भोपाळ; वृत्तसंस्था : उपाशीपोटी आपल्या मोडक्या संसाराचे किडुकमिडुक पचोर या गावाहून (जि. राजगड, मध्य प्रदेश) बैलगाडीवर लादून चार लेकरांची एकाकी आई (पतीचे निधन झाले आहे) लक्ष्मी ही तिच्या कन्येसह स्वत: बैलगाडी ओढत चालली होती. पंधरा किमी तिने कापलेले होते. पंधरा किमी बाकी होते. मोटारसायकलवरून चाललेल्या देवीसिंह नागर या शिक्षकाने विचारणा केली तेव्हा तिला रडूच फुटले.
नागर यांनी मग मोटारसायकलला बैलगाडी बांधली आणि लक्ष्मी यांना सारंगपूरपर्यंत पोहोचवून दिले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजगडचे जिल्हाधिकारी हर्ष दीक्षित यांनी लक्ष्मी यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.