उत्‍तर प्रदेशात डेंग्‍यूचा हाहाकार; ७० हून अधिक जणांचा मृत्‍यू | पुढारी

उत्‍तर प्रदेशात डेंग्‍यूचा हाहाकार; ७० हून अधिक जणांचा मृत्‍यू

फिरोजाबाद (उत्‍तर प्रदेश) ; पुढारी ऑनलाईन :  उत्‍तर प्रदेशात डेंग्‍यूचा हाहाकार माजला आहे. काल (शनिवार) केंद्र आणि राज्‍याच्या पथकाने यावर लक्ष ठेवले आहे. फिरोजाबाद मध्ये घेण्यात आलेल्‍या नमुन्यांमध्ये डेंग्‍यू असल्‍याचे निष्‍पन्न झाले आहे. दरम्‍यान, आतापर्यंत डेंग्‍यू  ७० हून अधिक जणांचा बळी घेतला आहे. लोकांमध्ये या आजाराविषयी इतकी भीती निर्माण झाली आहे की, नागरिकांनी अन्‍य जिल्‍ह्यांमध्‍ये  स्‍थलांतर सुरु केले आहे.

केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाच्या माहितीनुसार, दोनशे लोकांचे नमुने घेण्यात आले. यातील अधिकतर लोकांना डेंग्‍यू असल्‍याचे निष्‍पन्न झाले आहे.

उत्‍तर प्रदेशात डेंग्‍यूचा हाहाकार असाच सुरू राहिला तर, राज्‍यातील शाळा बंद केल्‍या जातील, असे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी म्‍हटले आहे.

केंद्रीय पथकाचा तपास…

शनिवारी भारत सरकारच्या राष्ट्रीय रोग नियंत्रण संघाचे सहसंचालक डॉ.तुषार यांच्यासह डॉक्टरांच्या टीमने वैद्यकीय महाविद्यालयाच्या वॉर्डमध्ये रुग्णांची भेट घेत व्यवस्थेची माहिती घेतली.

यावेळी त्‍यांनी डेंग्यूग्रस्त भागांना भेटी दिल्या. या दरम्‍यान या टीमला परिसरात डासांच्या अळ्याही सापडल्या हाेत्‍या.

मृतांचा आकडा ७० वर पोहोचला…

राष्ट्रीय रोग नियंत्रण संघाच्या पाहणी दरम्‍यान स्‍थानिक नागरिकांच्‍या घराला भेट दिली. त्‍यावेळी त्‍यांची तापाने आजारी असलेली मुलगी तसेच शेजारच्या एका आजारी मुलीला ॲम्‍ब्‍युलन्स मधून रूग्‍णालयात पाठवण्यात आले.

शनिवारी आणखी ४ जणांचा मृत्‍यू झाला. यासह जिल्‍ह्यात डेंग्‍यूने मृत झालेल्‍यांचा आकडा ७० हून अधिक झाला आहे.

लोकांमध्ये दहशत, इतर जिल्ह्यांमध्‍ये स्थलांतर…

लोकांमध्ये या आजाराविषयी इतकी भीती निर्माण झाली आहे की, आपल्‍या मुलांना या आजारापासून वाचवण्यासाठी लांबच्या नातेवाईकांकडे पाठवले जात आहे.

फिरोजाबाद ग्रामीण भागातील नगला अमान, दरिगपूर, सिरमई या गावातील प्रत्‍येक घरात एक रूग्‍ण आहे.

या गावातील लोकांनी आपली लहान मुले दुसऱ्या गावी नातेवाईकांकडे पाठवली आहेत.

शनिवारी आणखी काही रूग्‍णांचा उपचारा दरम्‍यान मृत्‍यू झाला.

१०० खाटांच्या फिरोजाबाद मेडिकल कॉलेजच्या रूग्‍णालयात रूग्‍णांची संख्या ४०० वर पोहोचली आहे. वाढती रूग्‍णसंख्या पाहून १५० खाटांचे नवा वॉर्ड तयार करण्यात येत आहे.

मेरठ जिल्‍हा रूग्‍णालयात दिवसाला ३०० रूग्‍ण दाखल…

मेरठ मध्ये तापाचे रूग्‍ण वाढले आहेत. यातील सर्व रूग्‍ण हे डेंग्‍यूचे नसून यातील अधिक रूग्‍ण हे व्हायरल इन्फेक्‍शन आणि तापाचे आहेत.

डॉक्‍टरांच्या माहितीनुसार, या आजारामध्ये रूग्‍णाला कमीत-कमी तीन दिवसापर्यंत ताप राहतो.

डोके आणि अंगदुखी, अस्वस्थता वाटणे ही लक्षणे आहेत.

रूग्‍णाची संख्या अधिक असल्‍याने सरकारी रूग्‍णालयाच्‍या यंत्रणेवर ताण पडत आहे.

Back to top button