मागेल त्यालाच वीज बिलावर 'अनुदान : मुख्यमंत्री केजरीवाल

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

file photo

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीत १ ऑक्टोबर पासून मागेल त्यालाच वीज बिलावर अनुदान देण्यात येईल. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी यासंबंधीची घोषणा केली. राज्यातील ४७ लाख ११ हजार १७६ कुटुंबीय सध्या वीज बिलावर अनुदानाचा लाभ घेत आहेत. वीज ग्राहकांना आता ऑक्टोबर महिन्यापासून वीजेवरील अनुदान सोडण्याचा अथवा निःशुल्क वीज पुरवठा मिळवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल.

नव्याने अर्ज करणाऱ्या ग्राहकांना २०० यूनिट पर्यंतच्या वीज वापरावर निःशुल्क राहील. २०० ते ४०० यूनिट पर्यंतच्या वीज वापरावर ग्राहकांना निम्मे बील भरावे लागेल. आर्थिकदृष्ट्या सक्षम, वीजबिल भरू शकणाऱ्या कुटुंबांना वीज अनुदान देऊ नये, अशी मागणी गेल्या काळात काही ग्राहकांकडून करण्यात आली होती. या मागणीच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने वीज बिलावरील अनुदानासाठी अर्ज करणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. ३० सप्टेंबर पर्यंत जुनी योजना लागू राहील. पंरतु, आता ऑक्टोबर महिन्यापासून वीज बिलावरील अनुदानासाठी नव्याने अर्ज करणाऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळणार असल्याचे केजरीवाल म्हणालेे. अर्ज दाखल करण्यासाठी ७०११३११११ हा क्रमांक मुख्यमंत्र्यांनी जारी केला. आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांवर वीजबिल अनुदानापोटी खर्च होणाऱ्या रकमेतून शाळा आणि रूग्णालये उभारली जावू शकतात, असा सल्ला दिल्लीकरांनी दिला होता, असे केजरीवाल यांनी सांगितले. राज्यातील १६ ते १७ लाख कुटुंब निम्मे वीज बील भरतात. तर, ३० लाख कुटुंबांना निःशुल्क वीज मिळत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

          हेही वाचलंत का ?
Exit mobile version