पुढारी ऑनलाईन डेस्क : लग्नाला यायचं हं…. असे लग्न पत्रिकेवरील आग्रहाचे निमंत्रण तुम्ही वाचलं असेलच. लग्न हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. नवं जीवनाची सुरुवात मानली जाते. त्यामुळेच लग्नाच्या पत्रिका छापून आपल्या हितचिंतकांचे आर्शीवाद घेतले जातात; पण घटस्फोटाला यायचं हं… अशी निमंत्रण पत्रिका वाचल्याने तुमच्या भुवया उंचावल्या ना?, असेच भुवया उंचावणारी निमंत्रण पत्रिका सध्या मध्य प्रदेशमध्ये तुफान व्हायरल होत आहे. ही पत्रिका वाचून अनेकांनी डोक्याला हात लावला तर काही संस्थांनी याचा तीव्र निषेध केला. ( Divorce Celebration ) या निषेधामुळे वाजत-गाजत होणार्या घटस्फोट आनंदोत्सव समारंभ रद्द करण्यात आला.
लग्न हा दोन जीवनाच्या नवजीवनाची सुरुवात असते. प्रत्येक ठिकाणी विवाहाचे रितीरिवाज वेगळे असेल तरी त्याचे महत्त्व सर्वत्र सारखेच आहे. घटस्फोट हा शब्द पती-पत्नीचे नातं कायदेशीररित्या संपणार यावर शिक्कामोर्तब असतं. हा काही साजरा करण्याचा उत्सव नाही. १८ पुरूषांनी घटस्फोटाची लढाई जिंकली. मध्य प्रदेशमधील भाई वेल्फेअर सोसायटी या स्वयंसेवी संस्थेने याचा आनंदोत्सव साजरा करत थेट घटस्फोटाची निमंत्रण पत्रिकाच छापली. ही पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.
भाई वेल्फेअर सोसायटी या स्वयंसेवी संस्थेने १८ सप्टेंबर रोजी घटस्फोट आनंदोत्सव कार्यक्रमाचे आयेाजन केले. याची पत्रिकाही छापली. घटस्फोटानंतर जीवन संपत नाही. घटस्फोट घेणाऱ्यांना हा संदेश प्रेरीत करेल. घटस्फोटासाठी पुरुषांना आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक आणि मानसिकदृष्ट्या खर्च करावा लागतो. मग एखाद्याला विवाहातून स्वातंत्र्य मिळाले तर ते साजरे करणे गरजेचे आहे, असेही या संस्थेने स्पष्ट केले आहे.
घटस्फोटाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी छापण्यात आलेल्या पत्रिकाही मजेशीर आहे. घटस्फोट आनंदोत्सव कार्यक्रमात लग्नाच्या हराचे विसर्जन, सर्वसाधारण लग्न समारंभात संगीत कार्यक्रम असतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात जेंट्स संगीताचे आयोजन करण्यात आले होते. 'शुद्धीकरण यज्ञ', मानवी प्रतिष्ठेसाठीच्या सात चरण आणि शपथ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा घटस्फोट आनंदोत्सव कार्यक्रम भोपाळच्या नजीक बिलखिरिया येथील एका रिसॉर्टमध्ये १८ सप्टेंबर रोजी होणार होता.
भाई वेल्फेअर सोसायटी ही स्वयंसेवी संस्था घटस्फोटासाठी कायदेशील लढाई लढणार्या पुरुषांसाठी एक हेल्पलाईनही चालवते. या सोसायटीच्या घटस्फोट आनंदोत्सव कार्यक्रमात २२० सदस्य सहभागी होणार होते. यासाठी घटस्फोट आनंदोत्सव कार्यक्रम पत्रिकाचेही वाटप झाले होते. मात्र भोपाळमधॅल काही संस्थांनी आणि नागरिकांनी या कार्यक्रमाचा तीव्र निषेध केला. अशा कार्यक्रमामुळे समाजात चुकीचा संदेश जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. तीव्र विरोध पाहता भाई वेल्फेअर सोसायटीने कार्यक्रम अखेर रद्द केल्याचे जाहीर केले. तसेच आमचा कार्यक्रम हा महिलांच्या विरोधात नव्हता तर केवळ कायद्याचा गैरवापर करणार्यांविरोधात होता, असा दावा या संस्थेने केला आहे.
हेही वाचा :