
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भविष्यात कामामध्ये आणि कामाच्या वेळेतही लवचिकता असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच केले होते. त्याला अनुसरून आता केंद्र सरकार नवे कामगार कायदे सर्वच राज्यांमध्ये लागू करण्यावर ठाम आहे. त्यानुसार पुरुष आणि महिला यांच्या वेतनात समानता आणण्यात येणार आहे. चार दिवस काम व तीन दिवस सुट्टी असे या नव्या व्यवस्थेचे स्वरूप असणार आहे. केंद्र सरकार आता देशातील नोकरदार वर्गाच्या कामामध्ये बदल करण्यासाठी नवे नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. ही व्यवस्था केव्हापासून लागू केली जाणार हे अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही. तथापि, नजीकच्या काळात ती कधीही लागू केली जाऊ शकते यात शंका नाही.
नवीन वेतन नियम लागू झाल्यानंतर हातात मिळणार्या पगारापेक्षाही (टेक होम सॅलरी) कमी पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. कोणत्याही कर्मचार्याचा मूळ पगार त्याच्या एकूण पगाराच्या 50 टक्के वा त्याहून अधिक असावा, अशी तरतूद नव्या कायद्यात करण्यात आली आहे.
जर तुमचा मूळ पगार जास्त असेल तर प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीएफही वाढणार आहे. सरकारच्या या नियमामुळे कर्मचार्यांना निवृत्तीच्या वेळी मोठी रक्कम मिळणार आहे. त्यासोबतच ग्रॅच्युईटीचे पैसेही अधिक मिळणार आहेत. त्यामुळे कर्मचार्यांचे भविष्य आर्थिकद़ृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे.
नव्या नियमानुसार आठवड्यात तीन दिवस सुट्टी असेल व चार दिवस कामाचे ठेवले जाणार आहेत. मात्र, तीन दिवस सुट्टी मिळणार असली तरी 12 तास काम करावे लागणार आहे. म्हणजेच आठवड्यातून 48 तास काम करावे लागणार आहे. त्यानंतर तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. तसेच यापूर्वी कोणत्या संस्थेत काम करताना दीर्घ सुट्टीसाठी कर्मचार्यांना 240 दिवस काम करावे लागत होते. आता मात्र नव्या कायद्यानुसार कर्मचार्यांना 180 दिवस काम करावे लागेल. त्यानंतर कर्मचार्यांना दीर्घ सुट्टी मिळेल.