भारत २०२९ पर्यंत तिसरी अर्थव्यवस्था

भारत

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारत 2029 पर्यंत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या एका अहवालात शनिवारी व्यक्त केली. 2014 मध्ये या यादीत देश 10 व्या स्थानावर होता. म्हणजे त्या तुलनेत सात स्थान तो वरती येऊ शकेल. ब्रिटनला मागे टाकून 10 व्या क्रमांकावर असलेली भारतीय अर्थव्यवस्था मोदी सरकारच्या काळात सध्या पाचव्या क्रमांकावर आहे.

2014 पासून भारताने अर्थव्यवस्थेबाबत ज्या मार्गाने वाटचाल करायला सुरुवात केली , त्यावरून 2029 पर्यंत देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून टॅग मिळण्याची शक्यता आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

या बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाच्या संशोधन अहवालात हेही स्पष्ट करण्यात आले आहे की, आर्थिक वर्ष 2023 साठी सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर 6. 7 ते 7. 7 टक्के दरम्यान अंदाजित आहे. परंतु जागतिक अनिश्चिततेमुळे तो 6 ते 6. 5 टक्के वाढ असणेही सर्वसाधारण असेल.

ब्लूमबर्गच्या शुक्रवारच्या अहवालानुसार ब्रिटनला मागे टाकून भारत जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. भारताने पहिल्या तिमाहीत आपली आघाडी वाढवली, हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून जे जीडीपीचे आकडे जाहीर झाले, त्यात स्पष्ट झाले आहे. परंतु एसबीआयच्या अहवालानुसार, डिसेंबर 2021 पर्यंतच भारत ब्रिटनला मागे टाकून पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली होती.

भारताचा जीडीपीमधील वाटा आता 3. 5 टक्के आहे. 2014 मध्ये तो 2. 6 टक्के होता. 2027 मध्ये तो 4 टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. हा जागतिक जीडीपी मध्ये जर्मनीचा सध्याचा वाटा आहे, असेही या अहवालात नमूद केले आहे. नवीन गुंतवणुकीच्या इराद्यांबाबत चीनचा वेग मंदावल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला कसे लाभ होतील, याचाही अहवालात उल्लेख करण्यात आला आहे.

अ‍ॅपल या जागतिक पातळीवरील कंपनीने आपल्या फ्लॅगशिप आय फोन 14 च्या उत्पादनाचा काही भाग भारतातून जगभरात पाठविण्याचा निर्णय 7 सप्टेंबर रोजी हा फोन दाखल झाल्यावर अल्पावधीत घेतला. हा या आशावादाचा पुरावा आहे, असेही त्यात म्हटले आहे . तथापि, दरडोई जीडीपीच्या बाबतीत भारत अजूनही जगातील बहुतांश अर्थव्यवस्थांच्या मागे आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये आपल्या देशातील दरडोई उत्पन्न (जीडीपी ) 2277 डॉलर्स होते. तर ब्रिटनचे दरडोई उत्पन्न 47, 334 डॉलर्स होते.

Exit mobile version