Sidharth Shukla : हार्ट अटॅक म्हणजे काय? | पुढारी

Sidharth Shukla : हार्ट अटॅक म्हणजे काय?

पुढारी ऑनलाईन डेस्क : अवघ्या ४० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने जगाचा निरोप घेणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याचं निधन झालं आणि सिनेमाविश्वात हळहळ व्यक्ती होऊ लागली आहे. आता पुन्हा एकदा हृदयविकार झटका हा विषय चर्चेत आला आहे.

क्रिकेटर कपील देव, सौरभ गांगुली, सुप्रसिद्ध डान्सर रेमो डिझूजा, कोरिओग्राफर सरोज खान, अभिनेत्री श्री देवी, तामिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता आणि आता सिद्धार्थ शुक्ला, अशी कितीतरी नावं आपल्याला घेता येतील. आपल्याला हृदयक्रिया बंद पडणे (Cardiac Arrest) आणि हृदयविकाराचा झटका (Heart attack) यातील फरकच नेमका माहीत नसतो. ते पहिल्यांदा जाणून घेणं महत्वाचं आहे.

sidhharth shukla

हार्ट अटॅक म्हणजे काय?

कार्डियाक अटॅक म्हणजेच हार्ट अटॅक, मराठीत त्याला हृदयविकाराचा झटका असं म्हटलं जातं. आपल्या कोरोनरी धमन्यांमध्ये मेदसंचय म्हणजेच चरबी जास्त झालेली असते. हीच चरबी वाढत जाऊन रक्तवाहिन्यांमधील आतील बाजू अरुंद होते. या अरुंदपणामुळेच रक्ताचा पुरवठा हा गरजेइतका होत नाही.

त्यामुळे हृदयाच्या कामाचा वेग हळूहळू कमी होतो. जेव्हा आपल्या कोरोनरी धमन्यांमध्ये ६० ते ८० टक्क्यांनी चरबी जास्त होते, तेव्हा रुग्णाला हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण अधिक असते. हार्ट अटॅकची प्रमुख कारणे धूम्रपान, मधुमेह,उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा, त्याचबरोबर फॅमिली हिस्टरीदेखील महत्वाचे कारण आहे.

हार्ट अटॅकची लक्षणं : आजच्या धकाधकीच्या जीवनाशैलीमुळे हृदयविकाराचा झटका कधीही येऊ शकतो. छातीच्या आणि पाठीच्या मध्यभागी वेदना होणे, डावा हात, जबड्याच्या खालची बाजू, पोटाच्या ठिकाणीदेखील वेदना जाणवणे, दम लागणे, श्वास घेताना अडचण येणे, घाबरल्यासारखे होणे, छाती आवळल्यासाठी वाटणे, हात-पाय थंड पडणे, चक्कर येणे, नीट चालता न येणे, अशी ही हार्ट अटॅकची  लक्षणं आहेत.

कोरोनामुळे प्रत्येकाला आरोग्याचं महत्व जास्त कळलेलं आहे. जो-तो स्वतःच्या आरोग्याबद्दल जागरूक असतो. व्यायाम करून आपण आजारमुक्त होऊ शकतो, असं नाही. कारण, कपील देव, सौरभ गांगुली, रेमो डिसुझा आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) यांसारखे दिग्गज खेळाडू, डान्सर आणि व्यायाम प्रिय असतानादेखील त्यांनी हृदयविकाराचे आजार दिसून आले आहेत.

sidhharth shukla

कार्डियक अरेस्ट म्हणजे काय? 

कार्डियक अरेस्टला मराठीत सरळ हृदयाची क्रिया अचानक बंद पडणं, असं म्हणतात. हा दिर्घ आजाराचा भाग नाही. कार्डियक अरेस्टमध्ये रक्ताभिसरणाची प्रक्रिया अर्थात हृदय धडधडण्याची प्रक्रिया बंद होते. सामान्यांमध्ये कार्डियक अरेस्ट आणि कार्डियक अटॅक एकच समजला जातो.

मात्र, हे दोन्ही प्रकार पूर्णतः वेगळे आहेत. तज्ज्ञांच्या मते, कार्डियक अरेस्टमध्ये हृदयाची धडधडण्याची प्रक्रिया बंद पडते, शरीराला अवयवांना होणारा रक्तपुरवठा अचानक थांबला जातो. या अवयवांमध्ये आपला मेंदूदेखील समाविष्ट असल्याने मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाहदेखील बंद होतो, त्यामुळे संबंधित व्यक्तीची शुद्ध हरपते.

कार्डियक अरेस्टची लक्षणं : सर्वांत पहिल्यांदा व्यक्तीला थकावट जाणवते. हृदयाचे ठोके वेगाने सुरू होतात. हृदयामध्ये वेदना होऊ लागतात. चक्कर येऊ लागते. शुद्ध हरपते आणि श्वासोच्छवास कमी व्हायला लागतो. हृदयविकाराचा ज्यांना आजार आहे त्यांच्यामध्ये कार्डियक अरेस्टची शक्यता जास्त आहे.

वेद्यकीय भाषेत सांगायचं झालं तर, कार्डियक अरेस्टमध्ये इलेक्ट्रिक कंडक्शनच्या बिघाडामुळे होतो. ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे. यामध्ये हृदयात वेंट्रिक्युलर फायब्रिलेशन निर्माण झाल्याने हृदयाच्या ठोक्यांवर थेट परिणाम होतो. त्यामुळे काही मिनिटांतच रुग्णाता मृत्यू होऊ शकतो. यामध्ये रुग्णाला शाॅक देऊन बंद पडलेले हृदय पुन्हा सुरू केले जाऊ शकते. तसेच कार्डियोपल्मोनरी रेसस्टिसेशन (सीपीआर) देऊन संबंधित रुग्णाचे ठोके सामान्य करता येतात.

त्यासाठी आरोग्याची माहिती असणंदेखील तितकंच महत्वाचं आहे आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे भारतासारख्या देशात हृदयविकारासंबंधी प्रकरणं इतकी असताना आपण गाफील राहून चालणार नाही. तर, या लेखातून कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये नेमका फरक कळला असेल अशी आशा आहे.

Back to top button