
चंदीगड : पुढारी ऑनलाईन : हरियाणातील रोड मराठा समाजाचे नेते मराठा वीरेंद्र वर्मा यांनी त्यांची एकता शक्ती पार्टी राष्ट्रवादीमध्ये विलीन केली. शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीतील राष्ट्रवादीच्या मुख्यालयात या सर्वांचा पक्ष प्रवेश झाला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ट्विट करत दिली आहे. "हरियाणातील एकता शक्ती पार्टीचे अध्यक्ष मराठा वीरेंद्र वर्मा आणि त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मला आनंद आहे की मराठा वीरेंद्र वर्मा यांनी यांनी राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला," असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
वर्मा हे हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील आहेत. कर्नाल हा देशातील अन्नधान्याचा प्रश्न सोडवण्याची ताकद असलेला जिल्हा आहे. शेतकऱ्यांना आतापर्यंत शेतमालाला योग्य किंमत मिळालेली नाही. वीरेंद्र वर्मा यांच्या सोबत राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करेल, असे पवार यांनी म्हटले आहे.
मराठा वीरेंद्र वर्मा यांनी दोनवेळा २००९ आणि २०१४ मध्ये बहुजन समाज पार्टीच्या तिकीटावर कर्नाल मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यांनी एकवेळा नालोखेडी आणि दोनवेळा असंध विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. त्यांनी मराठा एकता शक्ती पार्टीची स्थापना केली होती. रोड मराठा समाजाला राजकीय क्षेत्रात जागृत करण्याचे काम त्यांनी केले आहे. मराठा वीरेंद्र वर्मा हे कर्नाल जिल्ह्यातील दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात.