नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित, पंतप्रधान मोदींची घोषणा | पुढारी

नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित, पंतप्रधान मोदींची घोषणा

कोची; पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या उपस्थितीत आज केरळमधील कोची शिपयार्डमध्ये ‘आयएनएस विक्रांत’ (INS Vikrant) या युद्धनौकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी INS Vikrant वर नौदलाचा नवीन ध्वज ‘निशान’चे अनावरण केले. ‘आयएनएस विक्रांत’ ही पहिली स्वदेशी बनावटीची युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे. केरळमधील कोची येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला. नौदलाच्या नवीन ध्वजाला वंदन करुन मी हा नवीन ध्वज भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करत आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली. यावेळी पंतप्रधानांनी रामधारी सिंह दिनकर यांनी लिहिलेल्या कवितेतील ”नवीन सूर्य की नई प्रभा, नमो, नमो। नमो स्वतंत्र भारत की ध्वजा, नमो, नमो…” या ओळी म्हटल्या.

विक्रांत विशाल, विराट आणि विहंगम आहे. विक्रांत विशिष्ट आहे, विक्रांत विशेष आहे. विक्रांत केवळ युद्धनौका नसून ती २१ व्या शतकातील भारताचे कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेचा पुरावा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

आज केरळच्या सागरी किनाऱ्यावरून प्रत्येक भारतीय एका नव्या भविष्याचा सूर्योदय पाहत आहे. आजचा क्षण हा प्रत्येक भारतीयासाठी ऐतिहासिक आहे. त्यामुळे मी भारतीयांना शुभेच्छा देतो. आज देशाच्या नव्या आत्मनिर्भर भारताचं प्रतिबिंब म्हणजे  ‘आयएनएस विक्रांत’. भविष्यातील आव्हांनांना उत्तर म्हणजे ‘आयएनएस विक्रांत’. आयएनएस विक्रांतवर होणारा हा कार्यक्रम जागतिक क्षितिजावरील भारताच्या उगवत्या आत्म्याचा जयजयकार आहे. आज भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण आहे, असे पंतप्रधान नरेद्र मोदींनी म्हटले आहे.

Back to top button