नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सरत्या ऑगस्ट महिन्यात जीएसटी (GST) कर वसुलीत 28 टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये एकूण 1 लाख 43 हजार 612 कोटी रुपयांची करवसुली झाली असून यात केंद्रीय करांची वसुली 24 हजार 710 कोटी रुपये, राज्यांचे जीएसटी कर संकलन 30 हजार 951 कोटी रुपये तर एकात्मिक जीएसटी म्हणजे आयजीएसटीचे प्रमाण 77 हजार 782 कोटी रुपये इतके आहे.
आयजीएसटीमध्ये आयात वस्तुंवर आकारण्यात आलेल्या 42 हजार 67 कोटी रुपयांच्या कराचा समावेश आहे. उपकरातून सरकारला 10 हजार 168 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या ऑगस्टमध्ये 1 लाख 12 हजार 20 कोटी रुपये इतके जीएसटी कर संकलन झाले होते. त्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टमध्ये जीएसटी (GST) कराची झालेली वसुली 28 टक्क्यांनी जास्त आहे.
विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून जीएसटी (GST) कराचे मासिक संकलन 1.40 लाख कोटी रुपयांच्या वर राहिलेले आहे. कोरोना संकटातून अर्थव्यवस्था सावरत असून त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून जीएसटी करवसुलीत वाढ होत असल्याचे सरकारने नमूद केले आहे.