आज ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? | पुढारी

आज 'मन की बात' मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा : (मन की बात ) मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देश ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ साजरा करीत आहे. संपूर्ण जगात भारताच्या हॉकीचा डंका वाजवण्याचे काम ध्यानचंद जी यांच्या हॉकीने केले होते. चार दशकांनंतर, जवळ-जवळ ४१ वर्षांनी भारताच्या नवयुवकांनी, पुत्रांनी आणि कन्यांनी हॉकी खेळामध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकले आहे,अशा शब्दात रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करतांना ऑलिंपिकमध्ये चमकदार कामगिरी करणार्या भारतीय हॉकी संघासह इतर खेळाडूंचे कौतुक केले.

भारताला चार दशकांनंतर हॉकीचे पदक

पंतप्रधान म्हणाले की, देशाने कितीही पदकांची कमाई केली तरी जोपर्यंत हॉकीमध्ये देशाला पदक मिळत नाही, तोपर्यंत कोणाही भारतीयांना विजयाचा आनंद घेता येत नाही. ऑलिंपिकमध्ये भारताला चार दशकांनंतर हॉकीचे पदक मिळाले. भारताच्या या विजयामुळे मेजर ध्यानचंद जी यांच्या हृदयाला, आत्म्याला बराच आनंद झाला असेल. ध्यानचंद यांनी त्यांचे संपूर्ण जीवन खेळाला समर्पित केले होते, अशा शब्दात पंतप्रधानांनी मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली. मन की बात या कार्यक्रमाचा आज 80 वा भाग होता.

प्रत्येक परिवारामध्ये खेळासंबंधी चर्चा सुरू झाली. सर्वांच्या प्रयत्नांनीच भारत क्रीडा क्षेत्रामध्ये नवीन उंची प्राप्त करू शकेल. असा विक्रम निर्माण करण्याचा अधिकारही भारताला आहे.

मेजर ध्यानचंद जी यांच्यासारख्या लोकांनी जो मार्ग दाखवला आहे, त्यावरून पुढची वाटचाल करण्याची जबाबदारी आपली आहे. अनेक वर्षांनी देश हा कालखंड पहात आहे, अनुभवत आहे. खेळ या विषयाच्याबाबतीत कुटुंब असो, समाज असो, राज्य असो, राष्ट्र असो- एक मनाने सर्व नागरिक जोडले जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

भारताने आपल्या अंतराळ क्षेत्राला मुक्त केल्यानंतर युवा पिढीने ही संधी साधत त्याचा लाभ उठवण्यासाठी महाविद्यालयांतले विद्यार्थी, विद्यापीठ, खाजगी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले नवतरूण अगदी हिरीरीने पुढे आले आहेत. आगामी दिवसांमध्ये युवकांनी, विद्यार्थ्यांनी, महाविद्यालयांनी, विद्यापीठांनी, प्रयोगशाळांमध्ये विद्यार्थ्यांनी काम करून मोठ्या संख्येत उपग्रह बनवले आहेत, अशा शब्दात पंतप्रधानांनी देशातील तरूण पिढीचे कौतुक केले.

सर्वश्रेष्ठतेच्या दिशेने युवकांचे मन केंद्रीत

लहान-लहान शहरांमध्ये स्टार्ट-अप संस्कृतीचा विस्तार होत आहे.जगात खेळण्यांची खुप मोठी बाजारपेठ आहे. ६ ते ७ लाख कोटींच्या या बाजारपेठेत भारताचा हिस्सा बराच कमी आहे. परंतु खेळणी कशी बनवली पाहिजेत, खेळण्यांमध्ये वैविध्य कसे असले पाहिजे, खेळण्यांमध्ये तंत्रज्ञान नेमके कसे, किती असावे, मुलांच्या मानसिकतेचा विचार करून, त्या अनुरूप खेळणे कसे असावे.

या सर्व गोष्टींचा विचार आपल्या देशातील युवक करीत आहेत. देशातील युवक सर्वश्रेष्ठतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी स्वतःचे मन केंद्रीत करत आहे. युवक आता सर्वोत्तम कार्य करू इच्छितात, तसेच कोणतेही काम सर्वोत्तम पद्धतीने करू इच्छितात. हा ध्‍यास त्यांना लागला आहे, ही गोष्टही राष्ट्राच्या दृष्टीने एक खूप मोठी शक्ती बनणार आहे, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

स्वच्छता अभियानात अग्रेसर इंदुरवासियांचे कौतुक

कोरोना कालखंडामध्ये स्वच्छता अभियानाकडे आपल्याला जराही दुर्लक्ष करून चालणार नाही. राष्ट्रनिर्माणासाठी सर्वांच्या प्रयत्नांतूनच कसा सर्वांचा विकास होऊ शकतो, याचे उदाहरण आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरते आणि आपणही असेच काही करावे, यासाठी नवीन चैतन्यही निर्माण करते.

नव्याने विश्वास येतो. आणि हा विश्वासच आपल्या संकल्पाला नवसंजीवनी देत असतो. आता स्वच्छता अभियानाविषयी चर्चा सुरू झाली की इंदूरचे नाव घेतले जाते. कारण इंदूरने स्वच्छतेविषयी स्वतःची एक वेगळी आणि विशेष ओळख निर्माण केली आहे.

इंदूर शहर अनेक वर्षांपासून ‘स्वच्छ भारत क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. शहराने आपला पहिला क्रमांक कायम राखला आहे. इंदूरला आता ‘वॉटर प्लस सिटी’ बनवायचे आहे. ‘वॉटर प्लस सिटी’ याचा अर्थ असे शहर जिथे कोणत्याही प्रक्रियेविना कसल्याही प्रकारचे सांडपाणी कोणत्याही सार्वजनिक स्त्रोतांमध्ये सोडण्यात येणार नाही.

इथल्या नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या सांडपाणी वाहिन्या सांडपाणी प्रक्रिया करणा-या प्रकल्पांना जोडल्या आहेत. स्वच्छता अभियानही सुरू ठेवले आहे. आणि आता या कारणांमुळे सरस्वती आणि कान्ह या नद्यांमध्ये सोडले जाणारे दूषित पाणीही बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. आता सुधारणा दिसून येत आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी इंदुरवासियांचे कौतुक केले.

संस्कृत भाषेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन

अलीकडच्या काळात संस्कृत भाषेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. वारसा जोपासणे, सांभाळणे आणि नव्या पिढीकडे सोपवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे आणि भावी पिढीचा तो अधिकार आहे. या कामांसाठी सर्वांनीच एकत्रित प्रयत्न करण्याची आता गरज आहे. मित्रहो, अशाप्रकारचे प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींबद्दलची माहिती #celebratingSanskrit सह सोशल मीडिया वर शेअर करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

हे ही वाचलत का :

मुलगी क्रिकेट खेळणार म्हणून चिडवले : पण उंचावले तिने नाव कोल्हापूरचे

Back to top button