२०२४ मध्ये मोदीच होणार पंतप्रधान! पण ‘एनडीए’च्या काही जागा कमी होतील : सर्व्हे | पुढारी

२०२४ मध्ये मोदीच होणार पंतप्रधान! पण ‘एनडीए’च्या काही जागा कमी होतील : सर्व्हे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जनता दल युनायटेडचे नेते तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहार राज्य सरकारमध्ये भाजपशी काडीमोड घेऊन एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने विरोधी पक्षांमध्ये उत्साह संचारला होता. त्यावर इंडिया टुडे आणि सी-व्होटरच्या सर्व्हेच्या निष्कर्षांनी विरजण पडले आहे. नितीशकुमार यांनी भाजपची सोबत सोडल्याने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’च्या एकूण जागांवर काहीसा परिणाम होताना दिसतो. पण एनडीएला बहुमतासह पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदीच असतील, असा निष्कर्ष या सर्व्हेतून काढण्यात आला आहे.

महाआघाडीच्या (यूपीए) माध्यमातून 2024 मध्ये पंतप्रधान मोदी यांना टक्‍कर देऊ शकेल, असे मोठे नेतृत्व नितीश कुमारांच्या रूपात हाती लागल्याचे विरोधी पक्षांकडून बोलले जात होते, पण या सर्व्हेच्या निष्कर्षांनी विरोधकांच्या आशेवर पाणी फिरविले आहे.
लोकसभेच्या निवडणुकांना दोन वर्षे अवकाश असताना केंद्र सरकार आणि भाजपवर अनेक गंभीर आरोप करत नितीशकुमार ‘एनडीए’बाहेर पडले. नितीश कुमार बाहेर पडताच विरोधी पक्ष नरेंद्र मोदी आणि भाजपवर तुटून पडले होते. घटक पक्ष संपविण्याचे काम भाजपकडून होत असल्याचा या टीकेचा सूर होता.

इंडिया टुडने सी-व्होटरसह केलेल्या या सर्व्हेतून, विरोधकांच्या अनेकविध आरोपांवर मात करून मोदी हेच या क्षणालाही देशातील सर्वांत लोकप्रिय नेते असल्याचे तसेच पंतप्रधानपदासाठीची देशाची पहिली पसंती असल्याचे समोर आले आहे. सर्व्हेनुसार नितीश कुमार एनडीएसोबत असताना 543 सदस्यीय लोकसभेत एनडीएला 307 जागा होत्या. नितीश यांनी एनडीए सोडल्यानंतरया जागा 21 ने कमी झाल्या आहेत. दुसरीकडे शिवसेना शिंदे गट भाजपला येऊन मिळाला आहे. त्यामुळे लोकसभेत भाजपकडे या क्षणी 300 वर जागा आणि पूर्ण बहुमत आहे. आगामी निवडणुकीत जदयूने साथ सोडल्याने एनडीएच्या काही जागा गत निवडणुकांच्या तुलनेत कमी होतील, असा अंदाज या सर्व्हेतून वर्तविण्यात आला आहे.

सर्वाधिक पसंती मोदींनाच
‘मूड ऑफ द नेशन’ शीर्षकांतर्गत झालेल्या या सर्व्हेत 1.22 लाखांहून अधिक लोकांची मते नोंदविण्यात आली. 53 टक्के लोकांनी
2024 मधील निवडणुकांनंतर मोदीच देशाचे पंतप्रधान असावेत आणि असतील, असे मत नोंदविले आहे. 9 टक्के लोकांनी रााहुल गांधी यांना, तर 7 टक्के लोकांनी अरविंद केजरीवाल यांना पसंती दिली आहे.

आपण शर्यतीत नाही : नितीश कुमार
दरम्यान, सध्या बिहारचा विकास करणे, हेच आपल्या डोळ्यासमोरील ध्येय आहे. पंतप्रधानपदासाठी पात्र आणि लायक असलेल्या नेत्याची देशात कमतरता नाही. आपण मात्र पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही, असे नितीश कुमार यांनी पाटणा येथे सांगितले.

Back to top button