आता ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जींना ईडीची नोटीस | पुढारी

आता ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जींना ईडीची नोटीस

नवी दिल्ली; पुढारी वृत्‍तसेवा : अभिषेक बॅनर्जींना ईडीची नोटीस : प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना सक्‍तवसुली संचलनालय अर्थात ईडीने नोटीस बजावली आहे.

बंगालमधील बहुचर्चित कोळसा खाण घोटाळ्याशी संबंधित हवाला प्रकरणाच्या अनुषंगाने 6 सप्टेंबरला दिल्‍लीत तपास अधिकार्‍यासमोर चौकशीसाठी हजर रहावे, असे ईडीने नोटीशीत म्हटले आहे. ईडीने याबाबत अभिषेक यांच्या पत्नीलाही नोटीस पाठविली आहे.

बंगालमधील डायमंड हार्बर मतदारसंघाचे खासदार असलेले अभिषेक हे तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस देखील आहेत. हवाला प्रकरणात आरोपी असलेल्या अन्य आरोपींना सप्टेंबरमधील विविध तारखांना हजर राहण्यासाठी नोटिसा पाठविण्यात आल्या असल्याचे ईडी सूत्रांकडून सांगण्यात आले.

अभिषेक बॅनर्जींना ईडीची नोटीस

ईस्टर्न कोलफिल्डस कंपनीतील कोळसा खाण घोटाळ्याबाबत सीबीआयने नोव्हेंबर 2020 मध्ये गुन्हा दाखल केला होता. तृणमूलशी जवळचे संबंध असलेला अनूप मांझी हा घोटाळ्याचा प्रमुख आरोपी आहे.

ईस्टर्न कोलफिल्डस कंपनीच्या आसनसोल जिल्ह्यातील कुनुस्टोरिया तसेच काजोरा भागातील बेकायदा खणन करुन कोट्यवधी रुपयांची माया जमविल्याचा मांझी याच्यावर आरोप आहे. घोटाळ्यातला काही पैसा मांझी याने अभिषेक बॅनर्जी यांना दिल्याचा तपास संस्थांचा संशय आहे. बॅनर्जी यांनी आपल्यावरील आरोप याआधीच फेटाळून लावले आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button