Vice President Election : उपराष्ट्रपती पदासाठी आज मतदान; जगदीप धनकड आणि मार्गारेट अल्वा यांच्यात थेट मुकाबला | पुढारी

Vice President Election : उपराष्ट्रपती पदासाठी आज मतदान; जगदीप धनकड आणि मार्गारेट अल्वा यांच्यात थेट मुकाबला

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाचे उपराष्ट्रपती निवडण्यासाठी आज  (६ ऑगस्ट)  मतदान होत असून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनकड आणि विरोधी आघाडीच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात थेट मुकाबला होणार आहे. देशाचे उपराष्ट्रपती (Vice President) हे राज्यसभेचे सभापतीदेखील असतात. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व आले आहे. निवडणूक पार पडल्यानंतर आज (६ ऑगस्ट) सायंकाळी लगेच निकाल जाहीर केला जाणार आहे.

लोकसभा तसेच राज्यसभेचे सर्व खासदार हे उपराष्ट्रपती निवडणुकीचे मतदार आहेत. सकाळी 10 वाजता संसद भवनात उपराष्ट्रपती पदासाठी मतदानाला सुरुवात होईल. रालोआचे उमेदवार धनकड यांच्या बाजूने लोकसभेत 303 खासदार आहेत, तर राज्यसभेत 91 खासदार आहेत. धनकड यांच्या बाजूने स्पष्ट बहुमत असल्याने त्यांचा विजय ही औपचारिकता मानली जात आहे.

उपराष्ट्रपती निवडणुकीत धनकड यांच्या उमेदवारीला कोणत्याही आघाडीत सामील नसलेल्या बिजू जनता दल, बसपा, वायएसआर काँग्रेस आणि टीडीपीने पाठिंबा दिलेला आहे. वरील पक्षांचे दोन्ही सदनात मिळून 67 खासदार आहेत. याशिवाय शिवसेनेचे किमान 13 खासदार रालोआ उमेदवाराच्या बाजूने आहेत. थोडक्यात धनकड यांना या निवडणुकीत 65 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळू शकतात. राष्ट्रपती निवडणुकीप्रमाणे उपराष्ट्रपती निवडणुकीतही विरोधकांमध्ये फाटाफूट झालेली आहे. उमेदवार निवडताना आपल्याला विश्वासात घेतले नाही, असे सांगत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

राष्ट्रपती निवडणुकीत विरोधी गोटातील अनेक पक्षांनी रालोआच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्याची पुनरावृत्ती उपराष्ट्रपती निवडणुकीत झाली आहे. दरम्यान, उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदान कशा पद्धतीने करायचे, याचे प्रशिक्षण देण्यासाठी भाजपने शुक्रवारी आपल्या खासदारांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी यावेळी खासदारांना मार्गदर्शन केले.

Back to top button