पुढील सुनावणीपर्यंत आरे वसाहतीतील एकही झाड तोडू नका : सुप्रीम कोर्ट | पुढारी

पुढील सुनावणीपर्यंत आरे वसाहतीतील एकही झाड तोडू नका : सुप्रीम कोर्ट

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : मुंबईतील मेट्रो प्रकल्प टप्पा 3 च्या कारशेडसाठी आरे वसाहतीतील वृक्ष तोडण्याविरोधात पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सदर याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत एकही झाड तोडू नका, असे आदेश राज्य सरकार तसेच मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला शुक्रवारी दिले. यासंदर्भातील सुनावणी आता 10 ऑगस्ट रोजी होणार आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्गासाठी आरे वसाहतीत कारशेड उभारले जात आहे. राज्यात नवे सरकार सत्तेत आल्यानंतर या सरकारने आरे वसाहतीमधील कामाला दिलेली स्थगिती उठविली होती. तर एमएमआरसीने मेट्रो 3 च्या गाडीचे डबे आणण्यासाठी अडचण ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी सुरू केली होती. या छाटणीच्या नावाखाली आरे वसाहतीत बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल सुरु असल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे.

झाडे कापण्यास सर्वोच्च न्यायालयाची बंदी असताना प्रत्यक्षात झाडे कापली जात असल्याचे पर्यावरण कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. झाडे तोडण्याच्या विरोधातील याचिकेवर न्यायमूर्ती यू. यू. लळीत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असता खंडपीठाने पुढील सुनावणीपर्यंत एकही झाड तोडू नका, असे निर्देश राज्य सरकार आणि एमएमआरसीला दिले.

Back to top button