
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे सुपुत्र आणि मेघालय उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश रणजित वसंतराव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालूकामधील निमसोड हे त्यांचे मुळगाव आहे. मोरे यांचे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण निमसोड येथे झाले.पदवीचे शिक्षण कोल्हापूर येथून पूर्ण केल्यानंतर त्यांनी सांगलीतून विधीचे शिक्षण घेतले. १९८३ मध्ये त्यांनी माजी न्यायाधीश ए.पी.शहा यांच्याकडे अधिवक्ता म्हणून कामाला सुरूवात केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयातही त्यांनी अधिवक्ता म्हणून काम केले.अनेक शासकीय संस्थांचे अधिवक्ता म्हणून सरकारची बाजु त्यांनी मांडली.
२००६ मध्ये मोरे यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.तर, २०२० मध्ये मेघालय येथील उच्च न्यायालयात आधी न्यायाधीश म्हणून तर वर्ष २०२१ मध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. ३० जुलै २०२२ पासून त्यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण येथील अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
न्यायाधिकरणाच्या विविध खंडपीठांमध्ये ६९ माननीय सदस्य असून त्यापैकी ३४ न्यायिक सदस्य आणि ३५ प्रशासकीय सदस्य आहेत. कायद्यातील इतर तरतुदींच्या अधीन राहून, खंडपीठात एक न्यायिक सदस्य आणि एक प्रशासकीय सदस्य असतो.केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना प्रशासकीय सदस्य आणि न्यायिक सदस्यांचा समावेश असलेली एक विशेषज्ञ संस्था म्हणून करण्यात आली आहे जे त्यांच्या विशेष ज्ञानामुळे जलद आणि प्रभावी न्याय देण्यासाठी अधिक सुसज्ज आहेत.
केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना राज्यघटनेच्या अनुच्छेद ३२३-अ अन्वये सार्वजनिक सेवा आणि पदांवर नियुक्त केलेल्या व्यक्तींच्या सेवेच्या अटींशी संबंधित विवाद आणि तक्रारींच्या निवाड्यासाठी प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम, १९८५ च्या नुसार करण्यात आली, हे विशेष.