काँग्रेसची ‘ईडी’विरोधात लोकसभेत फलकबाजी | पुढारी

काँग्रेसची ‘ईडी’विरोधात लोकसभेत फलकबाजी

नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा फलकबाजी करणार्‍या चार खासदारांचे निलंबन मागे घेऊन काही दिवसही होत नाहीत, तोच लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांकडून पुन्हा सरकारच्या विरोधाचे फलक दाखविले गेले. विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे कामकाज वाया गेले.
लोकसभेत सकाळी अकरा वाजता कामकाजाला सुरुवात झाल्याझाल्या विरोधी सदस्यांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेऊन घोषणाबाजी सुरू केली. अध्यक्षांनी गदारोळातच अर्धा तास कामकाज रेटले. अधीररंजन चौधरी यांनी सर्वप्रथम फलक दाखविला. त्यानंतर इतर सदस्यांनी त्यांचे अनुकरण केले.

कौटुंबिक न्यायालय सुधारित विधेयक राज्यसभेत मंजूर

कौटुंबिक न्यायालय सुधारित विधेयक गुरुवारी राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाले. लोकसभेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर झाले आहे. राज्यसभेतील चर्चेवेळी केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरण रिजिजू म्हणाले की, प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात कौटुंबिक न्यायालयांची स्थापना ही काळाची गरज आहे. देशात 715 कुटुंबे न्यायालये आहेत. 11 लाख 43 हजार खटले प्रलंबित आहेत.

खरगे-गोयल ‘ईडी’ कारवाईवरून भिडले

(ईडी) कारवाईवरून राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, मला ‘ईडी’चे समन्स मिळाले; पण संसद अधिवेशन सुरू असताना मला चौकशीसाठी बोलावणे योग्य आहे का? पोलिसांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या घराला घेराव घालणे योग्य आहे का? यावर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, जेव्हा तुमचे सरकार होते तेव्हा तुम्ही त्यात हस्तक्षेप करत असाल; पण आमचे सरकार हस्तक्षेप करत नाही. त्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी आणखी तीव्र केली.

हेही वाचा

Back to top button