काँग्रेसचे नेते कुलदीप बिष्णोई यांचा भाजपमध्ये प्रवेश | पुढारी

काँग्रेसचे नेते कुलदीप बिष्णोई यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली; पुढारी वृत्‍तसेवा : हरियाणातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुलदीप बिष्णोई यांनी गुरुवारी (दि.४) रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत बिष्णोई यांनी भाजप उमेदवाराच्या बाजुने मतदान केले होते. तेव्हापासून त्यांच्या भाजप प्रवेशाची अटकळ बांधली जात होती.

दुसरीकडे जून महिन्यात काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देत बिष्णोई यांनी भाजप प्रवेश केला असून त्यांच्या अनुभवाचा पक्षाला लाभ होईल, अशी प्रतिक्रिया हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली आहे.

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी बुधवारी बिष्णोई यांनी आदमपूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. याच मतदारसंघातून पोटनिवडणुकीत ते भाजपकडून निवडणूक लढवू शकतात. भाजप मुख्यालयात बिष्णोई यांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री खट्टर यांच्याबरोबर हरियाणा भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. कुलदीप बिष्णोई हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे  पुत्र आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button