सुप्रीम कोर्टात भिडले ठाकरे-शिंदे गट! | पुढारी

सुप्रीम कोर्टात भिडले ठाकरे-शिंदे गट!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयातील बहुप्रतीक्षित खटल्याची पहिली सुनावणी बुधवारी झाली. शिंदे आणि ठाकरे गटादरम्यानचा जोरदार युक्‍तिवाद ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या खंडपीठाने सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलली. सर्वप्रथम तुमचे प्रकरण ऐकले जाईल, असे सरन्यायाधीशांनी दोन्ही बाजूंना उद्देशून सांगितले.

बुधवारच्या सुनावणीवेळी मूळ पक्ष कोणता आणि 16 आमदारांची अपात्रता या मुद्द्यांवर प्रामुख्याने युक्‍तिवाद झाला. शिंदे गटाकडून करण्यात आलेली मुख्यमंत्री बदलाची मागणी पक्षविरोधी ठरविता येणार नाही, असा युक्‍तिवाद अ‍ॅड. हरिष साळवे यांनी केला.

राज्यातील सत्तासंघर्षाच्या अनुषंगाने ठाकरे आणि शिंदे गटाकडून एकमेकांविरोधात अनेक याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. या याचिकांवर सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर एकत्रितपणे सुनावणी सुरू आहे. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना आपापले मुद्दे मांडण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला असल्याची टिपणी खंडपीठाने प्रारंभीच केली.

दोन्ही गटांचा युक्‍तिवाद ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलली. तुमची सुनावणी पहिल्या क्रमांकावर असेल, असेही खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी विस्तारित खंडपीठाकडे जाणार की, घटनापीठाकडे जाणार तसेच निवडणूक आयोगाच्या नोटिसीला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button