बंगळूर : दिल्लीच्या संशयित दहशतवाद्याशी शिरगुप्पीच्या तरुणाचे कनेक्शन | पुढारी

बंगळूर : दिल्लीच्या संशयित दहशतवाद्याशी शिरगुप्पीच्या तरुणाचे कनेक्शन

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  स्वातंत्र्य दिनापूर्वी समाजविघातक कृत्यांमधून सामाजिक शांतता बिघडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या संशयामुळे देशभर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) छापेमारी सुरू आहे. केंद्रीय व कर्नाटक राज्य गुप्तचर विभागही याचा तपास करीत आहे. याप्रकरणी दिल्लीतील रेहान अहंमद सिद्दीकी याला यापूर्वीच अटक केली आहे. त्याच्या संपर्कात शिरगुप्पी (ता. कागवाड, जि. बेळगाव) येथील तौसिफ दुंडी हा तरुण असल्याचे स्पष्ट झाले आहे. 31 जुलै रोजी अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे.

हिंदुत्ववादी संघटना, काही हिंदू नेते यांच्यावरील राग व्यक्‍त करण्यासाठी देशभरातील दहशतवादी संघटना सक्रिय झाल्या आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी रेहान सिद्दीकी याला यापूर्वीच अटक केली आहे. त्याची सखोल चौकशी करताना त्याने तौसिफशी संपर्क साधल्याचे उघड झाले आहे.

रेहान व तौसिफ हे दोघेजण एका व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर होते. या ग्रुपवर बॉम्ब तयार करण्यास शिका, अशी माहिती रेहानने दिली होती. ग्रामीण भागात फिरून मुस्लिम युवकांचा गट बनवा, त्यांना योग्य ते प्रशिक्षण द्या, असे आवाहन रेहानने केले होते. त्याला अनुसरून तौसिफने जिल्ह्यातील विविध गावांमध्ये, खेड्यांमध्ये फिरून मुस्लिम समाजावर कसा अन्याय होत आहे, हे सांगत त्याने तरुणांमध्ये प्रक्षोभक वातावरण निर्माण केल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. रेहानच्या दोन व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपमध्ये तौसिफ होता. यापैकी एका ग्रुपवर रेहान सातत्याने मेसेज करीत होता. बॉम्ब कसा तयार करायचा, याची माहिती घ्या. तोपर्यंत एक चांगला व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप बनवून नेहमी तयार राहा. योग्य वेळ आली की, मी तुम्हाला दुसर्‍या एका स्थळी बोलावून घेतो, असे रेहान सांगत होता, हे देखील पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

रेहानच्या बोलण्याने प्रभावित होऊन तौसिफ हा काही हिंदुत्ववादी संघटनांविरोधात द्वेष बाळगून होता.
सामाजिक शांतता बिघडविण्यासाठी तो संधी शोधत होता. तत्पूर्वीच त्याला पोलिसांनी पकडून कारागृहात पाठविले आहे. त्याच्याविरोधात भा.दं.वि. कलम 1860 अंतर्गत 120 बी, 153, 153ए व कलम 34 अंतर्गत कागवाड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांना माहिती न दिल्यामुळे अटक
रेहानने तौसिफला सोशल मीडियावर अनेक संदेश पाठविलेले आहेत. परंतु, त्यावर कोणतीही भडकावू प्रतिक्रिया तौसिफने दिलेली नाही. मग त्याच्याविरोधात गुन्हा व त्याला अटक का केली, याबाबत विचारणा केली असता त्याने दिल्लीतून संपर्क होऊनही याची माहिती पोलिसांना दिली नसल्याने त्याला अटक केल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.

Back to top button