गंगा नदीच्या ५०० मीटर परिसरात मांस विक्रीवर बंदी योग्यच: हायकोर्ट | पुढारी

गंगा नदीच्या ५०० मीटर परिसरात मांस विक्रीवर बंदी योग्यच: हायकोर्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : नैनीताल हायकोर्टाने उत्तराखंडमध्ये गंगा नदीच्या किनारी मांस विक्री (ban on meat business) करण्याच्या बाबतीतील एका प्रकरणी महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टने उत्तरकाशीमध्ये गंगा नदीच्या काठापासून ५०० मीटरच्या आतील मांस विक्रीच्या दुकानांवर घातलेली बंदी कायम ठेवली आहे. जिल्हा पंचायत आणि संस्थांना नियम बनवण्याचा अधिकार आहे, असेही न्यायालयाने या प्रकरणात म्हटले आहे. मांस विक्रीचे दुकान चालवायचे असल्यास जिल्हा पंचायत किंवा जिल्हा दंडाधिकारी यांचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असल्याचेही न्यायमूर्ती संजय कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे. (ban on meat business within 500 meters of ganga river is right says nainital high court)

उत्तरकाशी येथील रहिवासी असलेल्या नावेद कुरेशी यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. कुरेशी हे हिना गाव, ठाणे मणेरी येथील रहिवासी आहेत. 2006 ते 2015 पर्यंत ते जिल्हा पंचायतीचा परवाना घेऊन भाड्याच्या घरात मांस विक्रीचे दुकान चालवत होते. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी स्वतःचे दुकान सुरू करून मांस विक्रीच्या व्यवसाय प्ररंभ केला.

2016 मध्ये उत्तरकाशी जिल्हा पंचायतीच्या अतिरिक्त मुख्याधिकाऱ्यांनी गंगेच्या काठापासून 105 मीटर अंतरावर असल्याने सात दिवसांत दुकान हलवण्याची नोटीस दिली होती. या नोटिशीला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते. अन्न सुरक्षा मानक कायदा 2006 अंतर्गत परवाना मिळाला असून यात जिल्हा पंचायत हस्तक्षेप करू शकत नाही असे त्यांचे म्हणणे होते. यासंदर्भात कुरेशी यांनी हाय कोर्टात याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायमूर्ती संजय कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावत जिल्हा पंचायतीला उप नियम बनवण्याचा अधिकार असल्याचा निर्णय दिला. तसेच उत्तरकाशीचे जिल्हा दंडाधिकारी यांनी याचिकाकर्त्याला गंगा नदीच्या काठापासून 500 मीटरच्या आत मांस विक्रीचे दुकान सुरू करण्यास ना-हरकत प्रमाणपत्र न देऊन कोणतीही चूक केलेली नाही, असेही कोर्टाने सुनावणीवेळी म्हटले.

Back to top button