आईने शिवणकाम करून अचिंतचे स्वप्न केले साकार | पुढारी

आईने शिवणकाम करून अचिंतचे स्वप्न केले साकार

हावडा; वृत्तसंस्था : भारतीय वेटलिफ्टर अचिंत शुली याने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली आहे. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने भारताला तिसरे सुवर्णपदक जिंकून दिले. गोल्डन बॉय अचिंत शुलीवर क्रीडा जगतात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेपर्यंतचा अचिंत शुलीचा प्रवास खूप खडतर आहे. वयाच्या 11 व्या वर्षीच अचिंतच्या वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर शिलाई काम करत आईने घर चालवले. अचिंतने वयाच्या 10 व्या वर्षी वेटलिफ्टिंग क्षेत्रात प्रवेश केला. विशेष म्हणजे, अचिंतने आपल्या भावासोबत जिममध्ये वेळ घालवून याची सुरुवात केली. अचिंतप्रमाणेच त्याचा भाऊ अलोकला देखील वेटलिफ्टर बनायचे होते. मात्र, 2013 मध्ये वडिलांचे छत्र हरपल्यानंतर अलोकला आपले स्वप्न मागे ठेवावे लागले. या सगळ्यात अचिंत त्याचे स्वप्न जगत राहिला आणि त्याचे स्वतःचेच नव्हे तर भावाचेही स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला.

  • सुवर्णपदक जिंकल्यानंतर अचिंतने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी सुवर्ण जिंकल्यामुळे खूप आनंदी आहे. या पदकासाठी मी खूप मेहनत घेतली आहे.
  • माझा भाऊ, आई, माझे प्रशिक्षक आणि सैन्याच्या बलिदानामुळे मला हे पदक मिळाले, ही माझ्या आयुष्यातील पहिली मोठी स्पर्धा होती आणि हा टप्पा गाठल्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो.
  • हे पदक मला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मदत करेल. आता इथून मागे वळून पाहणार नाही.
  • माझे हे यश मी माझे दिवंगत वडील, माझी आई आणि माझे प्रशिक्षक विजय शर्मा यांना समर्पित करू इच्छितो.
  • माझे प्रशिक्षक मला नेहमी स्वतःच्या मुलासारखे वागवायचे आणि जेव्हाही माझ्याकडून चूक झाली तेव्हा ते कान धरून शिकवायचे, अशा भावना अचिंतने व्यक्त केल्या आहेत.

Back to top button