
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: कार्बन उत्सर्जन कमी करून प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार पर्यावरण स्नेही वाहनांना प्रोत्साहन (Electric Vehicle) देत आहे. देशातील विविध राज्यात इलेक्ट्रिक, बायोफ्युअल, सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत त्यामुळे वाढ झाली आहे. देशात सध्या १३ लाख ३४ हजार ३८५ इलेक्ट्रिक वाहने धावत आहेत. सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहने असलेल्या राज्याच्या यादीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. राज्यात १ लाख १६ हजारांहून अधिक इलेक्ट्रिक वाहने धावत आहेत.
(Electric Vehicle) तर, पहिल्या क्रमांकावर असलेल्या उत्तर प्रदेशात सर्वाधिक ३ लाख ३७ हजार १८० इलेक्ट्रिक वाहने असल्याची माहिती केंद्राने दिली आली. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशात सर्वाधिक कमी २० इलेक्ट्रिक वाहने असल्याचे कळतेय. भारतात सध्या २७ कोटी ८१ लाख ६९ हजार ६३१ बिगर इलेक्ट्रिक वाहने आहेत. तर, इलेक्ट्रिक आणि बिगर इलेक्ट्रिक असे एकूण २७ कोटी ९५ लाख ४ हजार १६ वाहने वापरात आहेत.
इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी यावरील जीएसटी १२ टक्के वरून ५ टक्के पर्यंत आणण्यात आला आहे. या वाहनांसाठीचे चार्जर, चार्जिंग स्टेशनवरील जीएसटी देखील १८ टक्के वरून ५ टक्केपर्यंत करण्यात आला आहे. जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, वाहनांच्या उत्सर्जनाच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने २०१५ मध्ये फेम इंडिया योजनेचा जलद गतीने अवलंब केला गेला. सध्या, फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०१९ पासून ५ वर्षांच्या कालावधीसाठी सुरु आहे.
अर्थसंकल्पात यासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना परवान्याच्या आवश्यकतेतून सूट दिली आहे.सर्व राज्यांनी इलेक्ट्रिक वाहनांवरील पथकर माफ करावा अशी सूचना देणारी अधिसूचना केंद्रीय परिवहन मंत्रालयाने जारी केली आहे.अशात येत्या काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य इलेक्ट्रिक बिगर इलेक्ट्रिक एकूण
१)उत्तर प्रदेश ३,३७,१८० ४,००,९२,४९० ४,०४,२९,६७०
२) दिल्ली १,५६,३९३ ७६,८५,६०० ७८,४१,९९३
३) कर्नाटक १,२०,५३२ २,६८,७०,३०३ २,६९,९०,८३५
४) महाराष्ट्र १,१६,६४६ ३,१०,५८,९९० ३,११,७५,६३६
५) बिहार ८३,३३५ १,०४,०७,०७८ १,०४,९०,४१३
हेही वाचलंत का ?