घाऊक महागाई निर्देशांकात किरकोळ घट | पुढारी

घाऊक महागाई निर्देशांकात किरकोळ घट

पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली: जून महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक 15.88 टक्क्यांच्या तुलनेत 15.18 टक्क्यांपर्यंत कमी झाला असल्याची माहिती, व्यापार मंत्रालयाकडून आज (दि.१४) देण्यात आली. जून 2021 मध्ये हाच निर्देशांक 12.07 टक्के इतका होता. सरत्या जूनमध्ये घाऊक महागाई निर्देशांक (डब्ल्यूपीआय) साडेपंधरा टक्क्यांच्या आसपास राहील, असा अंदाज होता. मात्र हा निर्देशांक 15.18 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

सलग पंधराव्या महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक दहा टक्क्यांवर राहिलेला आहे. जूनमध्ये खाद्यान्नाची महागाई 10.89 टक्क्यांवरून 12.41 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. मासिक तत्वावर ही वाढ 1.3 टक्क्यांनी जास्त आहे. जूनमध्ये डाळींच्या दरात मात्र घसरण झाली आहे. गव्हाचे दर किरकोळ प्रमाणात कमी झाले असून, भाजीपाल्याचे दर मात्र 16.5 टक्क्यांनी वाढले आहेत. निर्मिती क्षेत्राचा महागाई निर्देशांक 15 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर म्हणजे 9.19 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. डब्ल्यूपीआय निर्देशांकात निर्मिती क्षेत्राची हिस्सेदारी 65 टक्क्यांच्या आसपास आहे.

जूनमध्ये इंधन आणि ऊर्जा क्षेत्राच्या निर्देशांकात मासिक तत्वावर 0.7 टक्क्यांची वाढ झाली आहे. सरकारकडून अलीकडेच जूनमधील किरकोळ महागाईचे आकडे जाहीर करण्यात आले होते. मे महिन्यातील 7.04 टक्क्यांच्या तुलनेत हा निर्देशांक 7.01 टक्के इतका नोंदविला गेला होता. थोडक्यात किरकोळ आणि घाऊक महागाईचे आकडे पाहिले तर सर्वसामान्यांना अजूनही महागाईपासून पुरेसा दिलासा मिळालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा:

 

Back to top button