ई पोर्टल त्रुटीवरुन इन्फोसिसच्या मुख्याधिकार्‍याची झाडाझडती | पुढारी

ई पोर्टल त्रुटीवरुन इन्फोसिसच्या मुख्याधिकार्‍याची झाडाझडती

नवी दिल्ली; पुढारी वृत्‍तसेवा : आयकर खात्याच्या ई पोर्टल मधील त्रुटीमुळे आयकराचा भरणा करण्यास नागरिकांना मोठा त्रास होत असून यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी ई पोर्टल बनविणार्‍या इन्फोसिस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांची झाडाझडती घेतली.

गेल्या शनिवारपासून ई पोर्टलची समस्या निर्माण झाली असून त्यामुळे नागरिकांना आयकर रिटर्न दाखल करण्यात अडथळे येत आहेत.

अधिक वाचा :

अर्थ मंत्रालयाने सदर प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत पोर्टल विकसित करणार्‍या इन्फोसिस कंपनीचे मुख्य कार्यकारी सलील पारेख यांना पाचारण केले होते. त्यानुसार पारेख यांची अर्थमंत्र्यांनी झाडाझडती घेतली.

आयकर खात्याचे नवे पोर्टल विकसित होऊन अडीच महिने झाले आहेत. मात्र तरीही पोर्टलच्या अनुषंगाने अडथळे येत आहेत. २१ तारखेपासून स्वतः पोर्टलच उपलब्ध नसल्याचे वेबसाईटवर दिसून येत असल्याचे आयकर खात्याने सोशल मीडीयाद्वारे सांगितले होते.

अधिक वाचा :

८ जून रोजी हे पोर्टल लाँच करण्यात आले होते. त्याच्या दुसर्‍याच दिवशी नागरिकांना करभरणा करण्यात अडचणी येत असल्याचे निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिसच्या निदर्शनास आणून दिले होते.

त्यानंतर २२ जूनला सीतारामन यांनी येत असलेल्या अडचणींबाबत सलील पारेख यांना पाचारण करुन माहिती घेतली होती. सर्व त्रुटी दूर करुन सेवा सुधारावी, असे निर्देश अर्थमंत्र्यांनी दिले होते. मात्र तरीही पोर्टलसंदर्भात अडथळे येणे सुरुच आहे.

अधिक वाचा :

Back to top button