काबूलमध्ये अडकलेले १६८ भारतीय सुखरुप मायदेशी परतले | पुढारी

काबूलमध्ये अडकलेले १६८ भारतीय सुखरुप मायदेशी परतले

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : १६८ भारतीय सुखरुप मायदेशी परतले : काबुल विमानतळावर अडकलेल्या 168 प्रवाशांना घेऊन येणारे सी -17 ग्लोबमास्टर विमान सुखरूप भारतात पोहोचले आहे. हे विमान सकाळी 10 च्या सुमारास गाझियाबादमधील हिंडन एअर बेसवर पोहोचले. या प्रवाशांमध्ये 24 अफगाण शीख देखील असल्याचे सांगितले जाते.

यासह, दोन अफगाणिस्तान खासदार म्हणजेच सिनेटचाही समावेश आहे. त्यामध्ये तालिबानच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या सिनेटर अनारकलीचाही समावेश आहे. अफगाणिस्तानची राजधानी तालिबानच्या ताब्यात असलेल्या काबूलमधील भारतीय नागरिकांना घरी आणले जात आहे. असुरक्षिततेचे वातावरण पाहता अनेक परदेशी नागरिकही भारतात आले आहेत.

१६८ भारतीय सुखरुप मायदेशी परतले :

यापूर्वी दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर काबूलहून 3 उड्डाणे आली आहेत. ही उड्डाणे दोहा, ताजिकिस्तानमार्गे भारतात आली आहेत. एक विमान विस्ताराचे, दुसरे एअर इंडियाचे आणि तिसरे विमान इंडिगोचे आहे. सर्व पहाटे 4:30 ते 6 च्या दरम्यान आली आहेत. 250 भारतीय इंडिगो आणि एअर इंडिया फ्लाईटद्वारे आले आहेत.

माहितीनुसार, काबूलमधून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल. यानंतरच प्रत्येकजण विमानतळाच्या बाहेर येऊ शकेल.

काबूल विमानतळावरील परिस्थिती पाहता भारतात येण्यास इच्छुक असलेल्या भारतीय नागरिकांना आणि अफगाणांना बाहेर काढणे कठीण आहे. भारत सरकारने अफगाणिस्तानात अडकलेल्या आपल्या लोकांना बाहेर काढण्याची कसरत तीव्र केली आहे. 168 प्रवाशांना घेऊन येणाऱ्या विमानापूर्वी आज सकाळी आणखी तीन उड्डाणे भारतात आली आहेत.

त्याचवेळी, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करून काबूलमधून बाहेर काढलेल्या भारतीयांची माहिती दिली.

त्यांनी एक व्हिडीओ क्लिप देखील पोस्ट केली आहे ज्यात काबूलमधून बाहेर काढलेले लोक ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देत आहेत. त्याचबरोबर ते म्हणाले की, लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया यापुढेही सुरू राहील.

हे ही वाचलं का?

Back to top button