मेहबुबा मुफ्ती 'तालिबानी' भाषा बोलण्याचे कारण आहे तरी काय? | पुढारी

मेहबुबा मुफ्ती 'तालिबानी' भाषा बोलण्याचे कारण आहे तरी काय?

श्रीनगर; पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी शनिवारी पुन्हा एकदा अत्यंत वादग्रस्त आणि स्फोटक विधान केले. तालिबानींच्या आक्रमकतेपुढे बलाढ्य अमेरिकेला गुडघे टेकावे लागले.

अफगाणिस्तानातून त्यांना पळ काढावा लागला. यापासून बोध घेऊन केंद्र सरकारने काश्मीरबाबतच्या आपल्या धोरणात बदल करावा. अन्यथा ज्या दिवशी काश्मिरी जनतेच्या संयमाचा अंत होईल, त्या दिवशी तुमचा पराभव निश्‍चित असेल, असा इशारा देत तुमची गत अफगाणिस्तानसारखी होईल, असे त्या म्हणाल्या.

कुलगाम येथे मेहबुबा मुफ्ती यांनी हे वादग्रस्त वक्‍तव्य केले. स्वातंत्र्यानंतर भाजपचे सरकार केंद्रात आले असते तर काश्मीर भारतात राहिलाच नसता, असेही त्या म्हणाल्या.

‘ईडी पीडा’मुळे संतापल्या….

मेहबुबा मुफ्ती यांच्या संतापामागचे खरे कारण म्हणजे त्यांची आई गुलशन नजीर यांची सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेली चौकशी
हे आहे. ईडीने त्यांना चौकशीसाठी पाचारण केले. त्यानंतर तीन तास त्यांची चौकशी झाली. अधिकार्‍यांनी त्यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली. त्यामुळेच मेहबुबा मुफ्ती संतापल्या. त्यातूनच त्यांच्या तोडून हे विखारी वक्‍तव्य बाहेर पडले. गुलशन नजीर यांची मनी लाँडरिंग प्रकरणात तीन दिवसांपूर्वी चौकशी झाली आहे.

काश्मीर प्रश्‍नावर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जे धोरण स्वीकारले होते तेच धोरण सध्याच्या सरकारने राबविले पाहिजे. वाजपेयी यांनी काश्मीरच्या समस्यांवर तेथील जनमताचा आदर करून चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या सरकारला तर चर्चाच मान्य नाही. असे फार काळ चालणार नाही. काश्मिरी जनतेला त्यांचे विशेषाधिकार परत बहाल केले पाहिजेत. त्यांचा हक्‍क नाकाराल तर ते फार मोठे धारिष्ट्य ठरेल, असा इशारा त्यांनी दिला.

काश्मिरी जनतेला दुर्बल समजू नका, ते खूपच धाडसी आहेत. संयम बाळगायलाही धैर्य लागते. पण ज्या दिवशी येथील जनतेचा संयम संपेल, त्या दिवशी तुमचा पराभव अटळ असेल, असा इशारा मेहबुबा मुफ्ती यांनी दिला.

दरम्यान, मेहबुबा यांच्या वक्‍तव्याचा भाजपने जोरदार समाचार घेतला आहे. भारत हे अत्यंत शक्‍तिशाली राष्ट्र आहे. भारताच्या विरोधात जे कारस्थान रचतात, ते नेस्तनाबूत होतात, असा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे मेहबुबा मुफ्ती यांनी भलताच गैरसमज करून घेऊ नये, अशा शब्दांत प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांनी त्यांच्यावर पलटवार केला.

हे ही वाचलं का?

Back to top button