उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन | पुढारी

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन

लखनौ; पुढारी ऑनलाईन : कल्याण सिंह : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह (वय 89) यांचे शनिवारी रात्री येथे निधन झाले. त्यांच्यावर येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसजीपीजीआय) मध्ये उपचार सुरू होते.

कल्याण सिंह यांना श्‍वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागल्याने 21 जून रोजी लखनौमधील लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे 4 जुलैला त्यांना ‘एसजीपीजीआय’मध्ये भरती करण्यात आले. सुमारे दीड महिना
त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

गेल्या आठवड्यापासून त्यांची प्रकृती कमालीची खालावली. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अशातच शनिवारी रात्री 10 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्‍त केला आहे.

कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशमधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते. शपथविधी झाल्याबरोबर मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांसोबत अयोध्येत जाऊन राम मंदिर उभारण्याची त्यांनी शपथ घेतली होती. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यावेळी तेच मुख्यमंत्री होते.

कल्याण सिंह हे अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत कारसेवा आणि राम मंदिर आंदोलनातील एक प्रमुख नेते होते. प्रखर हिंदुत्ववादी नेता अशी त्यांची ओळख होती. त्यांनी दोनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषविले. पहिल्यांदा 24 जून 1991 पासून ते बाबरी विध्वंसाच्या घटनेपर्यंत म्हणजे 6 डिसेंबर 1992 आणि दुसर्‍यांदा 21 सप्टेंबर 1997 ते 12 नोव्हेंबर 1999 पर्यंत त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ होता.

30 ऑक्टोबर 1990 रोजी मुलायमसिंह यादव मुख्यमंत्री असताना कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला. राज्य शासनाने कारसेवक आणि राम मंदिरासाठी आंदोलकांविरोधात कडक पावले उचलली. अशावेळी भाजपने कल्याण सिंह यांचे नेतृत्व पुढे आणले. आपल्या प्रखर वक्‍तृत्व आणि हिंदुत्ववादी विचाराच्या जोरावर त्यांनी भाजपचे सरकार सत्तेत आणले. मात्र, 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद
विध्वंसानंतर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

या घटनेची चौकशी करणार्‍या लिबरहान आयोगाने त्यांना दोषी ठरवले. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना आयोगाने क्लीन चिट दिली. मात्र, कल्याण सिंह यांच्यासह भाजप सरकारवर कडक ताशेरे ओढले.

त्यांच्यासह अनेक नेत्यांविरोधात सीबीआयने खटले दाखल केले. मात्र, त्यांची मुक्‍तता करण्यात आली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांच्यावर 4 सप्टेंबर 2014 ते 8 सप्टेंबर 2019 अखेर राजस्थानच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

हे ही वाचलं का?

Back to top button