LPG Gas Cylinder Price : सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा फटका! घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला | पुढारी

LPG Gas Cylinder Price : सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा फटका! घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात (Domestic LPG Gas Cylinder Price) पुन्हा वाढ झाली आहे. १४.२ किलो वजनाचा घरगुती वापराचा गॅस सिलिंडरचा दर ५० रुपयांनी वाढला आहे. यामुळे दिल्लीत या सिलिंडरचा दर आता १,०५३ रुपयांवर पोहोचला आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे. तर ५ किलो वजनाचा घरगुती गॅस सिलिंडर १८ रुपयांनी महागला आहे. दरम्यान, १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ८.५० कपात करण्यात आली आहे.

ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्ली तसेच आर्थिक राजधानी मुंबईत १४.२ किलो वजनाच्या सिलिंडरचे दर १ हजार ५३ रुपयांवर गेले आहेत. जागतिक बाजारात इंधनाचे दर वाढल्याचे कारण देत तेल कंपन्यांनी ही दरवाढ केली आहे.

देशातील अन्य प्रमुख शहरांचा विचार केला तर कोलकाता येथे घरगुती गॅस सिलिंडरचे दर १,०७९ रुपयांवर गेले आहेत. चेन्नईमध्ये हे दर १,०६९, लखनौमध्ये १,०९१, जयपूरमध्ये १.०५७, पाटणामध्ये १,१४३, इंदोरमध्ये १,०८१, अहमदाबादमध्ये १,०६१, पुण्यात १,०५६, गोरखपूरमध्ये १,०६२, भोपाळमध्ये १,०५९ तर आग्रा येथे १,०६६ रुपयांवर गेले आहेत. गॅस सिलिंडरचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याआधी १ जुलै रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर दरात (commercial LPG Cylinder Price) १९८ रुपयांची कपात करण्यात आली होती. आता पुन्हा व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर दरात ८.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. पण घरगुती वापराचा सिलिंडर महागला आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त झाल्याने रेस्टॉरंट्स, भोजनालये, चहाचे स्टॉल्स आणि इतरांना दिलासा मिळाला आहे. पण घरगुती वापराचा सिलिंडर ((Domestic LPG Gas Cylinder Price) महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. याआधी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या (commercial LPG Cylinder Price) किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. १ मे रोजी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १०२.५० रुपयांनी वाढून २,३५५.५० रुपयांवर पोहोचली होती. एप्रिल आणि मार्चमध्येही १९ किलो व्यावसायिक एलपीजीची किमती अनुक्रमे २५० रुपये आणि १०५ रुपयांनी वाढली होती.

Back to top button