COVID19 | देशातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या १ लाखावर, मृत्यूंचा आकडा वाढला | पुढारी

COVID19 | देशातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या १ लाखावर, मृत्यूंचा आकडा वाढला

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात गेल्या काही दिवसांमध्ये सक्रिय कोरोनाबाधितांच्या (COVID19) संख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १८,८१९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील सक्रिय रुग्णसंख्या १ लाख ४ हजार ५५५ वर पोहोचली आहे. रुग्ण वाढल्याने दैनंदिन कोरोनासंसर्ग दर ४.१६ टक्क्यांवर गेला आहे. काल दिवसभरात १३,८२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत ५ लाख २५ हजार ११६ जणांचा कोरोनाने बळी घेतला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

मंगळवारी दिवसभरात १४ हजार ५०६ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ३० रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, ११ हजार ५७४ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.५६ टक्के नोंदवण्यात आला होता. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर ३.३५ टक्के आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर ३.३० टक्के नोंदवण्यात आला होता.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९७ कोटी ६१ लाख ९१ हजार ५५४ डोस देण्यात आले आहेत. यातील १४ लाख १७ हजार डोस काल एका दिवसात देण्यात आले आहेत. आतापर्यंत ३.६५ कोटी पहिले डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. दरम्यान, खबरदारी म्हणून आतापर्यंत ४ कोटी ५२ लाख २९ हजारांहून अधिक बूस्टर डोस देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी ११ कोटी ६७ लाख ४५ हजार ७५ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८६ कोटी १९ लाख २३ हजार ५९ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख ३३ हजार ६५९ तपासण्या मंगळवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात २३ नवीन कोरोना पॉझिटिव्ह

गेल्या २४ तासात यवतमाळ जिल्ह्यातील २३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर नऊ जण बरे झाले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ५५ झाली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण ७१४ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी २३ अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित ६९१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ७९,१५० आहे तर आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या ७७,२९२ झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण १,८०३ मृत्यूची नोंद आहे.

Back to top button