जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन भारतीय जवान शहीद | पुढारी

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन भारतीय जवान शहीद

जम्मू ; पुढारी वृत्तसेवा : भारत-पाक सीमेवरील राजौरी जिल्ह्यातील थन्‍नामंडी सेक्टरमध्ये गुरुवारी सकाळी दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत दोन भारतीय जवान शहीद झाले. चकमकीत एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आले.त्यानंतरही भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती.

सीमावर्ती भागात अनेक दहशतवादी लपून बसल्याच्या संशयाने भारतीय सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली. थन्‍नामंडी सेक्टरमध्ये गुरुवारी सकाळी दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक झाली.

यामध्ये एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. मात्र त्या बदल्यात दोन भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागले. लष्कराचे ज्युनिअर कमिशन ऑफिसरसह दोन जवानांना हौतात्म्य आले. सीमावर्ती भागातील जंगलात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली आहे.

त्यांची नाकाबंदी करण्याचे प्रयत्न सुरक्षा दलांकडून सुरू आहेत. नागरिकांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि भारतीय लष्कराने थन्‍नामंडीतील करयोट भागात शोधमोहीम राबवली. या दरम्यान दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार केला.

यामध्ये दोन भारतीय जवान गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुपारच्या सुमारास एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले.

यापूर्वी थन्‍नामंडी सेक्टरमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय लष्कराला यश आले होते. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा संघटनांच्या गटाने यापूर्वीच दक्षिण राजौरी सेक्टरमध्ये घुसखोरी केली आहे. जम्मूतील हिंदूंच्या धार्मिक स्थळावर ड्रोन हल्ला करण्याचा त्यांचा कट होता.

Back to top button