शिवसेनेचे आणखी तीन आमदार शिंदे गटात सामील, व्हिडिओ आला समोर | पुढारी

शिवसेनेचे आणखी तीन आमदार शिंदे गटात सामील, व्हिडिओ आला समोर

गुवाहाटी; पुढारी ऑनलाईन : शिवसेनेचे आणखी ३ आमदार आज बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले. हे आमदार गुवाहाटीमधील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधीही बरखास्त होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. तीन आमदारांना घेऊन जाणारी वाहने कडक पोलीस बंदोबस्तात हॉटेलमध्ये दाखल झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मंगेश कु़डाळकर, संजय राठोड आणि सदा सरवणकर असे ही तीन आमदार असल्याचे समजते.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समोर बसून चर्चा करण्याचा दिलेला प्रस्ताव धुडकावला असून, महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेने बाहेर पडावे या भूमिकेवर ते ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधल्यानंतर सायंकाळी शिंदे पत्रकार परिषद घेणार होते. मात्र तो बेत नंतर रद्द झाला. त्यानंतर रात्री सव्वा आठच्या सुमारास शिंदे यांनी दोन ट्विट करून मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुखांना उत्तर दिले. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्‍त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे- शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे, असे शिंदे पहिल्या ट्विटमध्ये म्हणतात.

पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी या अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असून, महाराष्ट्र हितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे, असे शिंदे यांनी दुसर्‍या ट्विटमध्ये म्हटले आहे. शिंदे सरकारमधून बाहेर पडण्यावर ठाम असल्यामुळे आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात यावर या बंडखोरीचे फलित अवलंबून असेल. मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर तसे मला फोन करून सांगा, असे उद्धव यांनी बंडखोरांना उद्देशून म्हटले होते. परंतु या दोन्ही ट्विटमध्ये शिंदे यांनी तशी कोणतीही मागणी केलेली नाही. मात्र, दोन्ही काँग्रेससोबतच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घ्या, असे शिंदे यांनी पुन्हा सांगून एक प्रकारे उद्धव यांना मुख्यमंत्रीपद सोडण्याचाच सल्‍ला दिला आहे.

सेना ताब्यातच घ्यायची आहे?

शिवसेनेत फूट पडणार नाही, पडू देणार नाही, असे एकनाथ शिंदे ठामपणे सांगत आहेत. त्यांच्या या विधानाने राजकीय विश्‍लेषक आधी गोंधळले आणि आता मात्र त्यांनी या विधानाचा वेगळाच अर्थ लावला आहे. एकूण रागरंग पाहता उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद हिरावून घेणे, एवढेच शिंदेंचे उद्दिष्ट नाही. शिवसेनाच ताब्यात घ्यायची आणि नंतर खरी शिवसेना आमचीच आहे, असा दावा करण्याचा त्यांचा विचार असल्याचे विश्‍लेषकांचे मत आहे. स्वत:ला वारंवार खरा शिवसैनिक संबोधून एकनाथ शिंदे हे मी का म्हणून बंडखोरी करू माझीच शिवसेना खरी आहे, ही बाब बिंबवत आहेत…

उद्धव ठाकरे यांच्यामागे राष्ट्रवादी ठामपणे राहणार

दरम्यान, एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचे ठरविले आहे. अशा कठीण राजकीय परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठामपणे राहू, असा निर्धार राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत बुधवारी व्यक्‍त करण्यात आला.

‘मी राजीनामा तयार ठेवतोय’

मुख्यमंत्रिपद किंवा पक्षप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास मी नालायक आहे, असे कोणाला वाटत असेल; तर मला समोर येऊन सांगा. मी दोन्ही पदे सोडायला तयार आहे. मी राजीनामा तयार ठेवतोय, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी बुधवारी ऑनलाईन संवाद साधला आणि रात्री ‘वर्षा’ बंगला सोडून ते ‘मातोश्री’ मुक्‍कामी पोहोचले.

Back to top button