उद्धव ठाकरे यांच्यामागे राष्ट्रवादी ठामपणे राहणार | पुढारी

उद्धव ठाकरे यांच्यामागे राष्ट्रवादी ठामपणे राहणार

मुंबई पुढारी वृत्तसेवा : एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचे ठरविले आहे. अशा कठीण राजकीय परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठामपणे राहू, असा निर्धार राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत बुधवारी व्यक्‍त करण्यात आला.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात काही ज्येष्ठ मंत्री व राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत सध्याच्या राजकीय हालचालींवर चर्चा झाली. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपण एक जबाबदार पक्ष आहोत. एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांना सत्तेतून बाहेर पडण्यास सांगितले असले, तरी हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्‍न आहे; पण महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत असल्यामुळे त्यांच्या पाठीशी राहणे योग्य असल्याची भावना अनेक आमदारांनी व्यक्‍त केली. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली व सध्याच्या राजकीय हालचालींची माहिती दिली. दरम्यान, गुरुवारी पुन्हा राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होणार आहे.

हेही वाचा

Back to top button