कागल लक्ष्मी टेकडी उड्डाणपुलास मंजुरी | पुढारी

कागल लक्ष्मी टेकडी उड्डाणपुलास मंजुरी

नवी दिल्ली ; पुढारी वृत्‍तसेवा : पुणे-बंगळूर महामार्गावरील कागलच्या श्री लक्ष्मी टेकडी येथील उड्डाणपुलास केंद्र सरकारने मंजुरी दिली असल्याचे केंद्रीय रस्ते व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितल्याची माहिती भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी बुधवारी दिली.

दै.‘पुढारी’चे अध्यक्ष व समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी ना. गडकरी यांच्याकडे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर कराड, सांगली फाटा व कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर उड्डाणपूल बांधण्याची मागणी केली होती.

दरम्यान, घाटगे यांनी दै.‘पुढारी’च्या दिल्‍ली कार्यालयास भेट दिली. सहयोगी संपादक श्रीराम जोशी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासह विविध विषयांवरील मते व्यक्‍त केली.

तत्पूर्वी, ना. गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी घाटगे यांनी भेट घेतली. लक्ष्मी टेकडीजवळ उड्डाणपूल उभा करण्याबाबत गेल्या मार्चमध्ये घाटगे यांनी ना. गडकरी यांना निवेदन दिले होते. यासोबतच बेळगाव-सावंतवाडी या प्रस्तावित रेल्वेमार्गास मान्यता मिळावी, बेळगाव-वेंगुर्ला महामार्गाचे विस्तारीकरण करावे, आदी मागण्यांवर चर्चा केली होती.

आजच्या भेटीत प्रस्तावित कागल-सातारा सहापदरीकरण कामावेळी लक्ष्मी टेकडीजवळ उड्डाणपूल बांधण्यास व कागल शहराजवळ एस.टी. बसस्थानकाच्या पश्‍चिम बाजूला असलेला पूल मोठा करण्यास ना. गडकरी यांनी मंजुरी दिली आहे, असे घाटगे यांनी सांगितले.

यासंदर्भात श्रीराम जोशी यांच्याशी बोलताना घाटगे म्हणाले की, लक्ष्मी टेकडी येथे उड्डाणपूल व्हावा, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्नशील होतो. याठिकाणी वाहतुकीची मोठी वर्दळ आहे. त्यामुळे असंख्य अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुलाचा प्रश्‍न मार्गी लागल्याने मोठी सोय होणार आहे.

दैनिक ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या मागणीला यश

केंद्रीय रस्ते व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दै. ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर कराड, सांगली फाटा व कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर उड्डाणपूल बांधण्याची मागणी केली होती. ना. गडकरी यांनी लक्ष्मी टेकडी येथील उड्डाणपुलाला मंजुरी दिली असून, डॉ. जाधव यांच्या मागणीला यश आले आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यामुळे गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बाधित होत आहे.

विशेषतः कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यामध्ये ज्या-ज्या ठिकाणी पुराचे पाणी महामार्गांवर येते, त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे काम केंद्र सरकारने हाती घ्यावे, अशी मागणी डॉ. योगेश जाधव यांनी केली आहे. ती लवकर पूर्ण व्हावी, अशी विनंती ना. गडकरी यांना केली असल्याचे घाटगे यांनी नमूद केले.

Back to top button