गुजरातचा औद्योगिक विकास झपाट्याने... | पुढारी

गुजरातचा औद्योगिक विकास झपाट्याने...

अहमदाबाद ; वृत्तसंस्था : प्रचंड यंत्रसामग्री, मुबलक साधने, विपुल इमारती आणि उद्योगांची अन्य मालमत्ता सातत्याने वाढत चालल्यामुळे गुजरात राज्य उद्योगधंद्यांच्या बाबतीत महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटकसारख्या उद्योगसंपन्न राज्यांना मागे टाकून अव्वल बनत चालले आहे. उद्योगस्नेही सरकार हेही यामागील महत्त्वाचे कारण असल्याचे दिसून येते.

उद्योग जगतातीतल कायमस्वरूपी भांडवल या संज्ञेचा राष्ट्रीय पातळीवर विचार केला तर 2012-13 या वर्षांत गुजरातचा वाटा 14.96 टक्के होता आणि 2019-20 या वर्षात तो तब्बल 20.59 टक्के झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. याच कालावधीत महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमधील कायमस्वरूपी भांडवलाचे प्रमाण गुजरातच्या तुलनेत घटल्याचे स्पष्ट झाले आहे.

उत्पादनशील भांडवलात बाजी

उत्पादनशील भांडवलाचा विचार केला तर तिथेही गुजरातने बाजी मारली आहे. या भांडवलामध्ये प्रामुख्याने कच्चा माल, अर्ध-तयार वस्तू, रोकड आणि स्थावर यांचा समावेश होतो. या बाबतीतही गुजरातने लक्षणीय प्रगती केली आहे. जसे की, 2012-13 साली गुजरातचा वाटा 15.1 टक्के होता आणि 2019-20 या वर्षात तो 19 टक्क्यांपर्यंत पोहोचला.

Back to top button