अनिल देशमुख : सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच! | पुढारी

अनिल देशमुख : सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : अनिल देशमुख : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयाला कोणतीही कठोर कारवाई करण्यापासून रोखावे, अशी मागणी देशमुखांनी न्यायालयाकडे केली होती. देशमुखांची ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. यामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
देशमुख यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती व्ही.सुब्रह्मण्यम यांच्या समावेश असलेल्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने देशमुखांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार इतर मुभा मिळवण्यास त्यांना स्वातंत्र्य आहेत, असे स्पष्ट केले.
देशमुखांच्या वतीने बाजू मांडताना विक्रम चौधरी म्हणाले की, देशमुखांच्या विरोधात सुडाचे राजकारण सुरू आहे. ईसीआयआर संदर्भात कागदपत्रे आणण्यास देशमुखांना सांगण्यात आले. परंतु, ईडीने त्यांना आणखी एक समन्स बजावले. त्यांचे सचिव आणि स्वीय सहायक यांना अटक केली.
ईडीने यापूर्वी देशमुखांना अनेक वेळा समन्स बजावले आहे. यावर त्यांनी आपल्या वकीलामार्फत उत्तर दिले. ईडीला सहकार्य करणार असल्याचे त्यांनी ट्विट केले. ईडीने तिसरे समन्स बजावल्यानंतर देशमुख तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यानुसार त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत दाद मागितली होती.
दरम्यान, देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे या दोघांना ईडीने आधीच अटक केली आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि विशेषकरून बदल्यांमध्ये अनिल देशमुख यांची भूमिका होती असे संजीव पलांडे याने जबाबात सांगितल्याचा दावा ईडीने केला आहे.
अनिल देशमुख यांच्या नागपूर व वरळी येथील घराची ईडीने झाडाझडती घेतली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. अनिल देशमुख यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे .
हे ही वाचलं का?

Back to top button